पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग, बोर्ड, बॅनरवरील कारवाईवर महापालिका आयुक्त नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयुक्तांनी या कारवाईचा दैनंदिन अहवाल देण्याचा आदेश आकाशचिन्ह व परवाना आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांना दिला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे जाहिरातबाजी केली जाते.
यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, शहराचे विद्रूपीकरणही होत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रतिअनधिकृत जाहिरात एक हजार रुपये दंड वसूल करण्याचे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा महापालिका आयुक्तांचा आदेश आहे. मात्र, आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभागाकडून आयुक्तांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता दाखवत कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.
जानेवारीपूर्वी जी-20 परिषदेसाठी महापालिकेस शहर स्वच्छ आणि विद्रूपीकरणमुक्त ठेवायचे आहे. मात्र, अतिक्रमण विभाग व आकाशचिन्ह विभागाकडूनच पालिकेच्या या नियोजनास हरताळ फासला जात असल्याने महापालिका आयुक्त नाराज असून, याबाबत झालेल्या कारवाईचा अहवाल दररोज सादर करण्याचा आदेश दिला आहे.