पुणे : लग्नाळूंनो, जन्मपत्रिका नव्हे, आरोग्यपत्रिका पाहा!

पुणे : लग्नाळूंनो, जन्मपत्रिका नव्हे, आरोग्यपत्रिका पाहा!
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोणतेही आजारपण किंवा संकट अनाहूतपणे उद्भवू शकते, यात शंकाच नाही. मात्र, एखाद्या आजाराबाबत पूर्वीपासून कल्पना असल्यास त्यादृष्टीने काळजी घेता येऊ शकते, लग्न जुळवताना वधू किंवा वर पक्षाला पूर्वकल्पना देऊन नात्याची सुरुवात पारदर्शकतेने करता येऊ शकते. म्हणूनच, आजकाल लग्न जुळवताना जन्मपत्रिकेऐवजी आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

तुळशी विवाह आटोपल्याने लगीनघाईचे दिवस सुरू झाले आहेत. यंदा जवळपास पन्नासपेक्षा जास्त लग्नतिथी आहेत. त्यामुळे लग्नाचा बार उडवून देण्याची सध्या विवाहेच्छुक तरुण-तरुणींच्या घरी लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे. अनुरूप स्थळ शोधणे, एखादे स्थळ आवडले की जन्मपत्रिका जुळताहेत की नाही, ते पाहणे, असा खटाटोप अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु वैवाहिक आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी जन्मपत्रिका पाहण्यापेक्षा आरोग्यपत्रिका पाहणे आवश्यक असल्याचे अधोरखित होत आहेत.

लग्न झाल्यानंतर एखादा त्रास उद्भवल्यास अथवा निदान झाल्यास आधी कल्पना दिली नाही, अशा कारणावरून वैवाहिक आयुष्यात संघर्ष निर्माण होण्याची उदाहरणेही आजूबाजूला पाहायला मिळतात. संघर्ष टाळता यावा आणि नात्यामध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी लग्नापूर्वी काही मूलभूत आरोग्य तपासण्यांकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. समलैंगितकेबाबतही खुलेपणाने चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आता विवाहपूर्व समुपदेशनही आवश्यक
विवाहाच्या निमित्ताने आयुष्याला नवे वळण मिळते. नवे कुटुंब, नवी माणसे, नव्या पध्दती असे अनेक बदल होणार असतात. बरेचदा नव्या आयुष्याला सामोरे जाण्याची मानसिक तयारी झालेली नसते, अनेक शंका-कुशकांनी मनात घर केलेले असते, भीती निर्माण झालेली असते. विवाहपूर्व समुपदेशनातून या संभ—मावर मात करता येऊ शकते. त्यासाठी तरुण-तरुणी समुपदेशकांची मदत घेऊ लागले आहेत.

सध्याच्या तरुणाईच्या जीवनशैलीमध्ये कमालीचा फरक पडला आहे. लहान वयातच मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, स्थूलता, हृदयविकार अशा अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. काही आजार अनुवंशिक, तर काही लैंगिक संबंधांमधून संक्रमित होणारे असू शकतात. आजारांबाबत वेळीच निदान झाल्यास त्यादृष्टीने उपचार, जीवनशैलीतील बदल, आहारविहार याबाबत निर्णय घेता येऊ शकतात.
                                                                     – डॉ. संकेत देशपांडे

धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात तरुण राहताना आणि अहोरात्र झटत असताना बर्‍याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उशिरा लग्न झाल्याने मूल हवे असल्यास नंतर अडचणी उद्भवू शकतात. वैवाहिक आयुष्य सुखकर व्हावे, यासह अन्य सर्व बाबींचा विचार करून लग्नापूर्वी मुलांनी आणि मुलांनी आरोग्य तपासणीबाबत जागरुकता बाळगायला हवी.
                                                                        – डॉ. अनिता पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news