बारामती: हप्त्याची मागणी करत टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, हाॅटेलमधील साहित्याची केली तोडफोड

file photo
file photo
Published on
Updated on

बारामती, पुढारी वृत्तसेवा: आम्हाला दरमहा पाच हजार रुपये खंडणी दिली नाही तर हाॅटेल चालू देणार नाही, असे म्हणत टोळक्याने बारामतीत हाॅटेलची मोडतोड करत तेथील लोकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बारामतीत घडली. शहर पोलिसांनी या प्रकरणी पाचजणांविरोधात प्राणघातक हल्ल्यासह खंडणी व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आदेश कुचेकर, तेजस बच्छाव ( दोघे रा. साठेनगर, बारामती), साहिल शिकिलकर (रा. लहुजीनगर, बारामती), पप्पू चंदनशिवे (रा. पंचशीलनगर, बारामती) व यश जाधव (रा. जूना मोरगाव रोड, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी रामवृजसिंह अजुहदी प्रसाद वर्मा (वय ३८,मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. फलटण रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे गेल्या दहा वर्षांपासून बारामतीत राहत आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी फलटण चौकात एक गाळा भाडोत्री घेत तेथे दुर्वाज या नावे हाॅटेल सुरु केले आहे. त्यांच्यासोबत नातेवाईक कालुवा राममुर्ती (वय २८) तेथे काम करतो. मंगळवारी (दि. ८) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास त्यांच्या अोळखीचे असणारे हे पाचजण तिथे गेले. त्यातील आदेश कुचेकर हा महेंद्र कुठे गेला आहे, त्याला लय मस्ती आली काय. मी त्याला भेटायला बोलावले होते. तो आला नाही. आज किती तारीख आली, हप्ता कोण त्याचा बाप देणार का, मी आत्ताच एका बारच्या मालकाकडून हप्ता वसूल करून आलोय, असे म्हटला. त्यावर वर्मा याने आज मालक येथे नाहीत असे सांगितले.

त्यावरून कुचेकर याने त्यांच्या पोटाला चाकू लावला. दरम्यान कालुवा हा तेथे आला असता तेजस बच्छाव याने त्याच्याकडील कोयता जीवे मारण्याच्या हेतून कालुवाच्या डोक्यात मारला. यामुळे त्याच्या डोक्याला मोठी जखम होऊन रक्तस्त्राव सुरु झाला. पप्पू चंदनशिवे याने फिर्यादीच्या डाव्या हाताला कोपऱ्यावर काचेची बाटली मारली. यश जाधव याने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कुचेकर याने तु हप्ता देणार आहेस की नाही, आम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर धंदा चालू देणार नाही. तसेच तुला येथून उडवून टाकीन, अशी धमकी दिली.

फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी हाॅटेलातील खुर्च्या व अन्य साहित्याची मोडतोड करत तलवार फिरवून शिविगाळ केली. या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी दुकाने बंद केली. तु पोलिसांना सांगितले तरी पोलिस माझं काही करणार नाहीत, पण तुला कायमचा उखडून टाकीन असे म्हणत कुचेकर व त्याचे सहकारी तेथून निघून गेले. त्यानंतर फिर्यादीने कलुवा याला तात्काळ दवाखान्यात नेले असता त्याला डोक्याला सात टाके घालावे लागले. त्यानंतर या प्रकरणी फिर्याद दाखल कऱण्यात आली.

वाढती गुन्हेगारी चिंताजनक

बारामती शहरात भाई, दादांचा हैदौस थांबता थांबत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दै. पुढारीने यासंबंधी नुकतेच बोकाळलेल्या गुन्हेगारीला आवर कधी ? हे वृत्त प्रसिद्ध केले होते. पोलिसांनी अशा लोकांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त करत या विभागावर आत्मचिंतनाची वेळ आल्याचे म्हटले होते. गत आठवड्यात भिगवण रस्त्यावर नामचिन गुडांकडून फायरिंगचा प्रकार घडला असताना परप्रांतिय हाॅटेलचालकाकडे हप्ता मागत जीवघेण्या हल्ल्याचा हा प्रकार घडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news