पुणेः धक्कादायक ! सेवानिवृत्त एसीपीच्या मुलानेच मैत्रिणीचे व्हिडीओ, फोटो पॉर्नसाईटवर केले अपलोड | पुढारी

पुणेः धक्कादायक ! सेवानिवृत्त एसीपीच्या मुलानेच मैत्रिणीचे व्हिडीओ, फोटो पॉर्नसाईटवर केले अपलोड

पुणेः पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलातून निवृत्त झालेल्या एसीपीच्या मुलाने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून मैत्रिणीचे खासगी क्षणातील फोटो, अश्लिल व्हिडीओ बनावट खाते तयार करून पॉर्न साईडवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी अमेय अनिल दबडे (रा. टिळेकर नगर कोंढवा बुद्रुक) याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च ते सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी अमेय दबडे हे दोघे कॉलेजचे मित्र आहेत. 2016 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण घेत असताना दोघांचा परिचय झाला होता. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. 2020 पर्यंत दोघांत प्रेमसंबंध होते. मात्र अमेय याच्या सततच्या भांडणाला कंटाळून तरुणीने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले होते. तेथील शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तरुणी पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली होती. दोघे व्हाट्स्अप व फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.

अमेय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. मात्र ती त्याला नकार देत होती. त्यातूनच अमेय याने तिला माझ्याकडे आपल्या शरीरसंबंधाचे फोटो व व्हिडीओ असून ते व्हायरल करण्याची तरुणीला धमकी दिली होती. मात्र तरुणी त्याच्यापासून दुर राहत होती. अनेकदा अमेय याने तरुणीशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. मार्च महिन्यात तरुणीच्या इन्स्टाग्रामवर एक रिक्वेस्ट आली. त्यावरून तरुणीला तिचे नग्न फोटो व व्हिडीओ पाठवल्याचे समजले. त्याचवेळी तिच्या मित्रांना देखील ते पाठवण्यात आल्याचे समोर आले.

हा प्रकार समोर आल्यानंतर तरुणीने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अमेय याने हा प्रकार केल्याचे समोर आले. त्यावेळी त्याच्या आई-वडीलांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागून असा प्रकार पुन्हा होणार नाही याची हमी दिली होती. त्यामुळे तरुणीने तक्रार मागे घेतली. तसेच अमेय याने न्यूड फोटो आणि व्हिडीओ डिलीट करतो असे सांगितले होते. त्यानंतर देखील अमेय याने असाच प्रकार केला. तरुणीने याबाबत त्याला विचारणा केली तेव्हा त्याने हे केले नसल्याचे सांगितले होते. तरुणीने ते खाते बंद केले. पुन्हा अमेय याने बनाट खाते तयार करून तरुणीचा संपर्क क्रमांक पोस्ट केला.

त्यानुसार तरुणीला वेश्यागमनासंदर्भात फोन सुरू झाले. तिला कोणीतरी आपले बनाट खाते तयार करून नंबर टाकल्याचे समजले. तसेच तरुणीच्या एका मित्राने देखील तिला तिचे व्हिडीओ आणि फोटो पॉर्न साईटवर अपलोड केल्याचे सांगितले. तिने पाहिले असताना तसे व्हिडीओ आणि फोटो दिसून आले. त्यानंतर तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तरुणीला हे कृत्य अमेय दबडे यानेच केल्याचे समजल्याने तिने याबाबत लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अमेय याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अमेय दबडे याचे वडिल एसीपी म्हणून पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास गुन्हे निरीक्षक काळे करीत आहे.

Back to top button