पुणे महापालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण; टिंबर मार्केटमधील घटना | पुढारी

पुणे महापालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण; टिंबर मार्केटमधील घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सफाई कामगाराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी टिंबर मार्केटमधील एका हार्डवेअर दुकानातील कामगाराला अटक केली. सोमवारी (दि. 7) सकाळी भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात ही घटना घडली होती. रघुसिंग बालसिंग भाटी (वय 29, रा. हरकानगर, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संतोष जाधव (वय 39, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

भाटी हा टिंबर मार्केट परिसरातील राजदीप हार्डवेअर दुकानात कामगार आहे, तर जाधव हे महापालिकेत सफाई कामगार आहेत. सोमवारी भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहासमोर असलेल्या रस्तासफाईचे काम जाधव करीत होते. त्या वेळी त्यांना कचर्‍याची मोठी पिशवी आढळून आली. जाधव यांनी पिशवी उलगडून पाहिली असता त्यामध्ये राजदीप हार्डवेअर दुकानाच्या नावाने बिले दिसली. त्यामुळे जाधव यांनी राजदीप हार्डवेअर दुकानाच्या पायरीवर ती पिशवी ठेवली. त्या वेळी भाटी तेथे आला. कचर्‍याची पिशवी पायरीवर का ठेवली? अशी विचारणा करून त्याने जाधव यांना शिवीगाळ करून जाधव यांना मारहाण केली.

Back to top button