पुणे : दारूला पैसे दिले नाहीत म्हणून केला खुनाचा प्रयत्न | पुढारी

पुणे : दारूला पैसे दिले नाहीत म्हणून केला खुनाचा प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकाने कोयत्याने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला, तसेच कोयत्याच्या धाकाने परिसरात दहशत निर्माण करीत राडा घातला. ही घटना सोमवारी (दि.7) दुपारी चार वाजताच्या सुमारास सर्व्हे नं. 206, दत्त मंदिरासमोर साडेसतरानळी, हडपसर येथे घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी बापू मकवाना नावाच्या व्यक्तीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अक्षय भोसले (वय 27, रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी भोसले हे त्यांचा मित्र कृष्णा जेठीथोर व भाऊ जाधव यांच्यासोबत गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी मकवाना हा तेथे आला. त्याने भोसले यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास भोसले यांनी नकार दिला. त्या वेळी त्याने भोसले यांना शिवीगाळ करून मी या एरियातला भाई आहे, तुला कळत नाही का पैसे दे म्हणजे दे, नाहीतर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.

दरम्यान, हा सर्व प्रकार सुरू असताना भोसले यांच्या मित्रांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तुला जिवंत सोडणार नाही, आता तुझा मर्डरच करतो, असे बोलून, भोसले यांच्या अंगावर जाऊन कोयत्याने डोक्यात वार केला. मात्र, तो त्यांनी चुकविला. त्यानंतर भोसले, त्यांची पत्नी, मित्र कृष्णा, भाऊ जाधव यांनी मकवाना याला धरण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी त्याने कोयता हातात घेऊन त्यांच्या अंगावर धावून जात लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मोठमोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. तसेच कोणी पोलिसात तक्रार केली, तर त्याला मी संपवतो, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर भोसले यांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सी. सी. थोरबोले करीत आहेत.

Back to top button