वाळूंजनगर परिसरात बिबट्याचा शेळीवर हल्ला, पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनांत वाढ | पुढारी

वाळूंजनगर परिसरात बिबट्याचा शेळीवर हल्ला, पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनांत वाढ

लोणी- धामणी, पुढारी वृत्तसेवा: वाळूंजनगर (ता. आंबेगाव) येथील दत्तात्रेय बाबूराव वाळूंज यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने रविवारी (दि. 6) रात्री अकराच्या सुमारास हल्ला केला. याच सुमारास तरकारीची वाहतूक करणारा टेम्पो आल्याने बिबट्याने धूम ठोकली. त्यामुळे म्हणून शेळी वाचली. बिबट्याचे दात शेळीला लागल्याचे ती जखमी झाल्याचे वाळूंज यांनी सांगितले.

या परिसरातील पाळीव प्राण्यांवर बिबट्याकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. या अगोदरही बिबट्याने अनेकदा शेळी, मेंढीवर हल्ला केला आहे. शिवाय अनेक कुत्री बिबट्याने फस्त केली आहेत. सध्या खरीप पिकांची काढणी तर रब्बीची पेरणी सुरू आहे. त्यातच बिबट्याचा वावर वाढल्याने शेतीच्या कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. वनविभागाने ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच विजय सिनलकर, माजी उपसरपंच महेंद्र वाळूंज व उद्योजक राजेंद्र वाळूंज यांनी केली आहे.

आंबेगावच्या पूर्व भागात मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी, धामणी, वाळूंजनगर, पोंदेवाडी, जारकरवाडी, लाखणगाव, मेंगडेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. जांबूत (ता. शिरूर) येथील घटनेची पुनरावृत्ती या भागात होऊ नये, यासाठी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button