पळसदेव : उजनी काठोकाठ; आता प्रतीक्षा देशी-विदेशी पक्ष्यांची! | पुढारी

पळसदेव : उजनी काठोकाठ; आता प्रतीक्षा देशी-विदेशी पक्ष्यांची!

प्रवीण नगरे

पळसदेव : राज्यात पर्जन्यमान चांगले झाल्याने उजनी धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षीही देश-विदेशातील पक्षी पुढील काही दिवसांत येऊन दाखल होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागताच उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून अनेक उत्तुंग पर्वतश्रेणी व अथांग महासागरावरून प्रवास करून हजारो किलोमीटर अंतर पार करून दरवर्षी उजनी पाणलोट क्षेत्रात शेकडो प्रकारचे विदेशी पक्षी न चुकता उजनीच्या वार्‍या करतात.

उजनी धरण निर्मितीपासून या परदेशी पाहुण्यांचे आगमन व काही महिन्यांच्या वास्तव्यानंतर पुन्हा निर्गमन हे चालूच असते. दरवर्षी पावसाळ्यात हे पक्षी उजनीवर येण्यास सुरुवात करतात. पावसाळ्याच्या शेवटी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरते व तेथील जलचर प्राण्यांचे जीवनचक्र जोमाने सुरू होते.

या जलचरांवर गुजराण करण्यासाठी नानाविध पक्षी भारताची सीमा ओलांडून स्थलांतर करून उजनी परिसरात येऊन दाखल होतात. अनंत अडचणींवर मात करून हे पक्षी पुढील तीन, चार किंवा पाच महिन्यांसाठी उजनीवर आपला मुक्काम ठोकतात. या वास्तव्यात बहुतांशी पक्षी उदरनिर्वाह करतात, तर काही पक्षी प्रजननोत्पत्ती करून घेतात. सामान्यपणे उजनीवर स्थलांतरित पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून तीन टप्प्यांत येतात. पहिला टप्पा ऑक्टोबर, दुसरा टप्पा डिसेंबर मध्यापर्यंत, तर शेवटचा टप्पा डिसेंबर महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच्या दिवस असा आहे.

पहिल्या टप्प्यात तुतुवार, नदी सुरय, समुद्र पक्षी (गल पक्षी), मत्स्य गरूड, विविध धोबी पक्षी आणि नाना तर्‍हेच्या बदकांचा समावेश असतो. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत नकेर (नकटा बदक), शेंर्द्या बड्डा (पोचार्ड), काणूक (टील्स), चक्रवाक, पट्टकदंबसरग्या (पिनटेल), बटवा, ससाणे (केस्ट्रल) मत्स्य गरूड, शिखरा (हॉबी), भोवत्या, मधुबाज (मोहाळ्या बझर्ड) हे पक्षी येऊन दाखल होतात.
डिसेंबर व जानेवारी महिन्यात रोहित (फ्लेमिंगो), पट्टकदंब (बार हेडेड गूज), कलहंस (ग्रे लॅग गूज), चक्रवाक (ब—ाह्मणी डक), चिखल बाड्डा (गार्गेनी), श्वेतबलाक, क्रौंच (डोमसाईल व सायबेरियन क्रेन्स), फॅलोरोप हे पक्षी जिल्ह्यातील अनेक जलस्थानासह उजनीच्या विस्तृत पाणलोट क्षेत्रात येऊन दाखल होतात.

मासे व जलचरांच्या वाढीस पोषक वातावरण
यावर्षी उजनी धरण अपेक्षापेक्षा लवकर भरले व संपूर्ण पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला; परिणामी खूप वर्षांपासून साठवून राहिलेले मृत पाणी उजनीतून बाहेर पडून त्याठिकाणी नवीन पाणी साठल्याने पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलेल्या मासे व इतर जलचर वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या कारणाने वाढणार्‍या मासे व जलकीटक तसेच शैवालांचा अंदाज घेत या वर्षी विदेशातून पाहुणे पक्षी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे, असे मत उजनीवर नित्यनेमाने भटकंती करणारे पक्षी निरीक्षक व्यक्त करत आहेत.

बीन हंस या वर्षी येतील का?
धरण निर्मितीनंतर गेल्यावर्षी प्रथमच आलेला बीनहंस हा उत्तर ध—ुवाकडील नार्वे, स्वीडन, फिनलँड या शीतवलयातील देशांमधून तसेच रशिया आणि मंगोलिया येथून नेहमी येणार्‍या पट्टकदंबहंसांच्या सहवासाने या वर्षीसुद्धा येईल का, हे सध्या चर्चेत आहे.

हवामानातील अस्थिरता व अनियमितता याचा स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांच्या प्रवासावर विपरीत परिणाम होतो. यावर्षी पावसाळा सरताना धो-धो पडलेला पाऊस व अचानक पडलेली थंडी आणि लगेचच वाढलेल्या तापमानामुळे पक्ष्यांच्या आगमनावर परिणाम झालेला जाणवतोय. याच कारणामुळे ऑक्टोबर महिन्यात दाखल होणारे गलपक्षी (समुद्र पक्षी) व मत्स्यघार अद्याप आले नाहीत. वातावरण स्थिरावल्यानंतर धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढेल.

                                                 – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

Back to top button