पिंपरी : उद्योग मंत्र्यांसमवेत लवकरच उद्योजकांच्या समस्यांवर बैठक | पुढारी

पिंपरी : उद्योग मंत्र्यांसमवेत लवकरच उद्योजकांच्या समस्यांवर बैठक

पिंपरी : पिंपरी- चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांच्या समस्यांसंदर्भात येत्या 19 नोव्हेंबर रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे लघु उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले. पिंपरी- चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील औद्योगिक परिसरात व चाकण औद्योगिक परिसरात उद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांबाबत सोमवार (दि. 7) उद्योजकांच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी आमदार महेश लांडगे उपस्थित होते. पालिकेने पिंपरी- चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना ‘एलबीटी’ची बाकी रक्कम व्याज व शास्ती दंडासह भरण्याच्या नोटिसा पाठविलेल्या आहेत. बिलाची नोटीस कायमस्वरूपी रद्द करावी. ‘एमआयडीसी’च्या जागेवरील झोपडपट्टी काढून टाकण्याबाबत निर्णय घेऊन त्या जागा लघु उद्योगांना उपलब्ध करून द्याव्यात.

पालिका मिळकतकरात चार टक्के मलनिस्सारण कर आकारते; मात्र सुविधा देत नाही. सीइटीपी प्लांट साठी एमआयडीसीने पालिकेला जागा दिली होती; परंतु अद्याप ‘सीइटीपी’प्लांट उभारणी झालेली नाही. औद्योगिक परिसरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.

औद्योगिक परिसरातील बेकायदा भंगार दुकानांवर कारवाई करावी. औद्योगिक परिसरातील अग्निशमन केंद्राचा प्रश्न मार्गी लावावा. उद्योजकांच्या मागण्यांबाबत येत्या 19 नोव्हेंबर रोजी पिंपरी- चिंचवडमध्ये बैठक घेण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे संदीप बेलसरे यांनी सांगितले.

वाहतूककोंडीप्रश्नी केंद्रीयमंत्र्यांची भेट घेऊ
चाकण एमआयडीसी रस्ता वाहतूक कोंडीबाबत आपण चाकण एमआयडीसी व तळेगाव एमआयडीसीची बैठक घेतली. गरज पडल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊ, एमआयडीसीचा रस्ता जि.प. व एमआयडीसीत विभागला आहे. जि.प.व एमआयडीसीच्या प्रशासनाशी बोलणे झाले आहे. रस्ता रुंदीकरणाबाबत विचार चालू आहे. तशा सूचना दिल्या आहेत.

Back to top button