पिंपरी : पावसाळा संपला तरी खड्डे कायम; जनसंवाद सभेत संतप्त नागरिकांच्या तक्रारी | पुढारी

पिंपरी : पावसाळा संपला तरी खड्डे कायम; जनसंवाद सभेत संतप्त नागरिकांच्या तक्रारी

पिंपरी : पावसाळा संपला तरी, अद्याप शहरातील बहुतांश भागांतील रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. वारंवार तक्रारी करूनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खड्ड्यामुळे लहान-मोठे अपघात होत असून, वाहनचालक जखमी होत आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी रस्ते तातडीने योग्य प्रकारे दुरूस्त करावेत, अशी तक्रार जनसंवाद सभेत सोमवारी (दि. 7) करण्यात आली.

88 नागरिकांनी केल्या तक्रारी
महापालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या सभेत एकूण 88 नागरिकांनी 125 पेक्षा अधिक तक्रारी मांडल्या. त्यात वरील तक्रारींही अनेक नागरिकांनी केल्या. पावसाळ्याची उघडीप मिळाल्यानंतर तातडीने खड्डे बुजविणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही शहरातील बहुतांश रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी मोठी गैरसोय होत आहे.

पदपथांवरील पेव्हिंग ब्लॉक तत्काळ बसवा
तसेच, विविध कामांसाठी रस्ते खोदून ठेवले असून, त्यांची दुरूस्ती व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण केली जावीत, रस्त्याच्याकडेला पदपथांवर उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावे आणि त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, पदपथांवरील राडारोडा उचलावा, पदपथांवरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. रस्त्यालगत असलेल्या वाहतुकीस अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा, कचरा संकलित करण्यासाठी येणार्या घंटागाड्या नियमित येतील याची दक्षता घ्यावी, उघड्यावर कचरा टाकणार्या नागरिकांवर तसेच, रस्त्यावर कचरा जाळणार्यांवर कारवाई करावी, अशा विविध तक्रारी सभेत करण्यात आल्या.

सभेचे अध्यक्षपद पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, भूमी व जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. तसेच बंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Back to top button