पुणे-पानशेत रस्त्यावर उभारले सरंक्षक कठडे; वाहने कोसळून अनेक निष्पाप जिवांचा बळी | पुढारी

पुणे-पानशेत रस्त्यावर उभारले सरंक्षक कठडे; वाहने कोसळून अनेक निष्पाप जिवांचा बळी

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांसह हजारो नागरिकांची नेहमी वर्दळ असलेल्या खडकवासला धरण तीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावर संरक्षक कठड्यांचा अभाव आहे. यामुळे हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून, या रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी सोमवारी लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी दुर्घटना घडत असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’मध्ये रविवारी (दि.6) प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी लक्ष घालून सोमवारी सकाळी धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याचे काम सुरू केले. जेसीबी मशिनने धरण तीरालगतच्या रस्त्यावर खड्डे घेऊन सिमेंट काँक्रीटमध्ये शंभर फूट लांब अंतरावर लोखंडी कठडे उभारण्यात आले आहेत.

कुरण गावाजवळ माऊलाई मंदिराजवळ खडकवासला धरणात दुचाकीवरून पुण्याकडे जाणारी महिला कोसळून बेपत्ता झाली आहे. ती धरणात कोसळल्याचा पोलिसांचा संशय आहे. अलका विनायक राऊत (वय 34), असे या महिलेचे नाव आहे. यापूर्वीदेखील या ठिकाणी कार, तसेच टेम्पो कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वाहने कोसळून दुर्घटना घडत असतानाही धरण तीरावरील धोकादायक रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आमदार भीमराव तापकीर यांनी अधिकार्‍यांसह काही दिवसांपूर्वी पानशेत रस्त्याची पाहणी करून सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. पानशेत रस्ता निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा मुत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यालगत असलेले धरणाचे पाणलोट क्षेत्र अत्यंत खोल आहे. झाडीझुडपे दलदल आहे. दुसर्‍या बाजूला डोंगर आहे. तीव— चढ व उतार असल्याने या ठिकाणी वाहने थेट धरणात कोसळून दुर्घटना घडत आहे. पानशेत भागात पर्यटनासाठी दररोज शेकडो पर्यटक येतात. विविध शासकीय कार्यालये, संस्था आहेत. ऐंशी गावांना जोडणारा हा मूख्य मार्ग आहे. रस्त्यावर संरक्षक कठडे उभारण्यात यावे, याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

Back to top button