

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षातील दहा महिन्यांत शहर पोलिस दलातील दहा पोलिस लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. त्यामध्ये एक अधिकारी आणि नऊ कर्मचार्यांचा समावेश आहे. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत आठ गुन्हे दाखल आहेत. लाचेची मागणी आणि लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे हे गुन्हे आहेत. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदारासह दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रविवारी (दि.6) सायंकाळी 25 हजार रुपयांची लाच घेतना औंध पोलिस चौकीच्या परिसरात रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलिस दलातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिस हवालदार प्रशांत विठ्ठल जाधव (वय 50) आणि अजित शांताराम गायकवाड (वय 37) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. दोघांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 21 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. दोघांना न्यायालयाने 9 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे गायकवाड याला गेल्या काही दिवसांपूर्वी वाहतूक विभागाला संलग्न करण्यात आले होते. तरीदेखील त्याने जाधव याच्यासोबत मिळून 25 हजार रुपयांची लाच घेतली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे कामकाज दिले असतानादेखील चौकीला थांबून दोघे अर्थपूर्ण कर्तव्य चोख पार पाडत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांचे अनेक कारनामे वरिष्ठांच्या कानावर गेले होते. त्यांना अनेकदा समजदेखील देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्यांच्या वर्तनास सुधारणा होत नव्हती. अखेर दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले.
तक्रादार यांच्या आतेभावावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दोघांनी सुरुवातीला पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. 3 नोव्हेंबर रोजी त्यांनी ही लाच मागितली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर खातरजमा केली तेव्हा दोघांनी लाच मागितल्याचे समोर आले. दोघांच्या विरुद्ध तांत्रिक पुरावा एसीबीच्या पथकाने जमा केला होता.
शेवटी 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार व त्यांचा आतेभाऊ यांना दोघांनी फोन करून लाच घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार दोघे औंध चौकीजवळच्या परिसरात लाच घेताना जाधव याला पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, आत्तापर्यंत झालेल्या कारवाईत बहुतांश पोलिसांनी गुन्ह्यात मदत करण्याच्या बहाण्याने लाच मागितल्याचे निदर्शनास आले आहे.