पुणे : पु. ल. देशपांडे यांचा सोशल मीडियावरही बोलबाला! | पुढारी

पुणे : पु. ल. देशपांडे यांचा सोशल मीडियावरही बोलबाला!

सुवर्णा चव्हाण

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याने कधी हसविले, तर कधी विचार करायला लावला. आज पुलंचे हेच साहित्य युवा पिढीलाही हवेहवेसे वाटत आहे. त्यामुळेच पुलंच्या आवाजातील कथाकथन असो वा त्यांच्या मुलाखती…त्यांचे साहित्यावरील अभिवाचन असो वा त्यांच्या पुस्तकातील काही भागांवरील सादरीकरण…यावर आधारित व्हिडिओज समाजमाध्यमावर उपलब्ध आहेत.

मंगळवारी पु. ल.देशपांडे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा आढावा घेण्यात आला. यू-ट्यूब चॅनेल्सवरील पुलंच्या व्हिडिओंना 10 लाखापर्यंतचे व्ह्युव्ज असून,“बटाट्याची चाळ’, ‘अपूर्वाई’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी पुलंच्या पुस्तकातील अभिवाचनांच्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद आहे.

पुलंच्या साहित्याची वेगळी छाप युवा पिढीच्या मनावर कोरली आहे. त्यामुळेच फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब अशा विविध सोशल मीडिया व्यासपीठावर त्यांच्या मुलाखतींचे व्हिडिओ उपलब्ध असून, या सर्वांचा चाहता वर्ग मोठा आहे. विशेष म्हणजे पुलंनी स्वत: सादर केलेल्या विनोदी सादरीकरणाचे जुने व्हिडिओ तर खूप फेमस आहेत. एका-एका व्हिडिओला 8 ते 10 लाखांपर्यंतचे व्ह्युव्ज असून, 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींकडून सर्वाधिक प्रमाणात हे व्हिडिओज् पाहिले जात आहेत.
पु

ण्याच्या संस्कृतीवर असलेले पुलंचे विनोदी सादरीकरण,“अपूर्वाई’ पुस्तकाविषयीचे त्यांचे सादरीकरण, ‘निवडक पुलं’ या व्हिडिओतून खदखदून हसविणारे पुलं आणि पुलंच्या पुस्तकातील विविध पात्रांवर आधारित असलेले सादरीकरण…याला पसंती मिळत आहे.
याबाबत वीरेंद्र चित्राव म्हणाले, पुलंच्या साहित्याची भुरळ प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये आहे.

आता जी स्टॅण्डअप कॉमेडी होते, त्याचे जनक पुलं आहेत. आजही त्यांचे विनोदी व्हिडिओ लोकांना भावत असून, त्यांची भाषणे, किस्से, मुलाखती, स्टॅण्डअप कॉमेडी हे आजही युवा पिढीला हवेहवेसे वाटते. अनेक सोशल मीडियावरील व्यासपीठांवर पुलंच्या व्हिडिओला खूप व्ह्युव्ज आहेत. पूर्वी ऑडिओ व्ह्युज्युअल माध्यम असे बळकट नव्हते. त्यावेळी श्रद्धानंद ठाकूर यांनी यांच्याकडे कॅमेरा होता. ते पुलंचे कार्यक्रम शूट करून ठेवायचे. त्यामुळे पुलंचे सादरीकरण पाहण्यासाठी उपलब्ध झाले.

ऑडिओ बुक्स ‘सुपरहिट’
‘बटाट्याची चाळ’, ‘अपूर्वाई’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी पुलंची पुस्तके आणि ऑडिओ बुक्स युवक-युवतींमध्ये सुपरहिट आहेत. पुलंच्या मुलाखतींचे ऑडिओही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ऐकले जात आहे. अधिकृत संकेतस्थळे आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर ऑडिओ बुक्स उपलब्ध असून, ते मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केले जात आहेत. पुलंच्या पुस्तकांच्या ई-बुक्सलाही मोठी मागणी आहे. नवा माध्यमांवरही पुलंचे साहित्य उपलब्ध असून, त्यांच्या पुस्तकांच्या ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सलाही चांगला प्रतिसाद आहे.

Back to top button