पुणे; पुढारी वृत्तसेवा : बदलती जीवनशैली, आहारातील बदलामुळे तरुणींमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत होत असलेल्या तपासणीमधून संबंधित आकडेवारी समोर आली आहे. शहरात 26 सप्टेंबरपासून एका महिन्यात 18 ते 30 वर्षे वयोगटातील 2 लाख 93 हजार 800 तरुणींची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी 5703 तरुणींमध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झाले. उच्च रक्तदाबाचे तरुणींमधील प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वजन आणि आहार योग्य पातळीवर ठेवणे आणि जीवनशैलीशी निगडित काही विशिष्ट सवयींमध्ये सुधारणा करणे गरजेचे ठरते. महापालिकेतर्फे 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत आतापर्यंत 2 लाख 93 हजार 800 मुलींची आणि 1 लाख 23 हजार 865 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर 16 हजार 894 महिलांची गर्भधारणा सेवा कार्यक्रम तपासणी आणि 16 हजार 34 गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली.
18 ते 30 वर्षे वयोगटातील 5703 तरुणींमध्ये उच्च रक्तदाब, 2071 तरुणींमध्ये रक्तक्षय, 1605 जणींमध्ये मधुमेह यांचे निदान झाले. 30 वर्षापुढील 2231 महिलांमध्ये उच्च रक्तदाब, 1306 जणींमध्ये मधुमेह, 50 जणींमध्ये कर्करोग आणि 67 जणींमध्ये हृदयविकाराचे निदान झाले. 1357 गर्भवतींमध्ये रक्तदाब, 233 जणींमध्ये मधुमेहाचे निदान झाल्याची माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.
जास्त वजनासह अन्य समस्यांमुळे 'बीपी'
लठ्ठपणा, रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल यामुळे उच्च रक्तदाब तरुणींमध्ये आढळून येऊ शकतो. पीसीओडी, जास्त वजन, फॅटी लिव्हर, तसेच गर्भधारणेतील काही समस्यांमुळे उच्च रक्तदाब बळावतो. गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही काही महिलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रणिती लिमये यांनी दिली.