पुणे : शस्त्रक्रियेने जिव्हेला जीवदान; कॅन्सरग्रस्ताला बसवली छातीच्या स्नायूंपासून बनवलेली नवी जीभ | पुढारी

पुणे : शस्त्रक्रियेने जिव्हेला जीवदान; कॅन्सरग्रस्ताला बसवली छातीच्या स्नायूंपासून बनवलेली नवी जीभ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जिभेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. जिभेचा कॅन्सर झालेल्या एका 56 वर्षीय व्यक्तीची जीभ कापून त्याजागी नवीन जीभ तयार करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. ही नवीन जीभ या व्यक्तीच्या छातीच्या स्नायूपासून तयार करण्यात आली आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. प्रफुल्ल प्रधान, कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. कमलेश बोकिल आणि प्लॉस्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन डॉ. अमित मुळे यांनी एकत्रितपणे ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. सुधीर कांबळे हा रुग्ण सांगली जिल्ह्यातील आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जिभेला जखम झाली होती. जखम वाढत गेल्याने स्थानिक डॉक्टरांना दाखविले.

कुटुंबीयांनी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात आणले. डॉ. प्रफुल्ल प्रधान यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. बायोप्सी चाचणीत रुग्णाला जिभेचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे टोटल ग्लॉसेक्टॉमी शस्त्रक्रिया करून रुग्णाची जीभ काढून टाकली आणि नवीन जीभ तयार केली.

डॉ. प्रफुल्ल प्रधान म्हणाले, ‘जखमेचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी बायोप्सी चाचणी केली. अहवालात रुग्णाला जिभेचा कर्करोग असल्याचे निदान झाले. हा कर्करोग जिभेच्या उजव्या बाजूला सुरू होऊन डाव्या बाजूला पसरला होता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करून जीभ काढून टाकणे, हा एकमेव पर्याय होता. त्यानुसार नातेवाइकांची परवानगी घेऊन टोटल ग्लॉसेक्टॉमी शस्त्रक्रियेद्वारे ही जीभ काढून टाकण्यात आली. याशिवाय मानेतही कर्करोगाच्या गाठीही काढून टाकण्यात आल्या. कर्करोग वाढल्यास शस्त्रक्रिया करून जीभ काढून त्याजागी नवीन जीभ तयार केली जाते. यामुळे रुग्णाला अन्न गिळता येऊ शकते. बोलतानाही अडचण येत नाही.”

काय म्हणतात कर्करोग शल्यचिकित्सक?
कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. कमलेश बोकली म्हणाले, ‘तोंडाच्या कर्करोगाची समस्या सर्वांत मोठी आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाच्या खास करून जिभेच्या कर्करोगाचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत. 30 ते 50 वयोगटातील पुरुषांमध्ये जिभेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. ’

Back to top button