चारा टंचाईने दूध उत्पादक चिंतेत; आंबेगावच्या पूर्व भागातील स्थिती | पुढारी

चारा टंचाईने दूध उत्पादक चिंतेत; आंबेगावच्या पूर्व भागातील स्थिती

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : अतिपावसामुळे चारा सडून गेल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आतापासूनच चारा टंचाईचा सामना दूध उत्पादक शेतकर्‍यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी बटाट्याचा पाला, उसाचे वाढे जनावरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे. दुधाला दर वाढत असतानाच एरव्ही उन्हाळ्यात जाणवणारी चारा टंचाई यंदा हिवाळ्यातच जाणवू लागल्याने दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून दुधाच्या दरात चांगली वाढदेखील होत आहे. या भागात खासगी दूध संकलन करणारे व्यावसायिक अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्यामध्ये दुधाला जादा दर देण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामुळे शेतकर्‍यांना दुधाचे दर आता चांगले मिळू लागले आहेत.
दरम्यान, दूध व्यवसायात शेतकर्‍यांना यंदा चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे.

यंदाचा पावसाळी हंगाम हा चारा पिकांसाठी हानिकारकच ठरला आहे. अतिपावसाचा फटका सर्वच चारा पिकांना बसल्याने सर्वत्र चारा सडून खराब झाला. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी चारा टंचाई यंदा हिवाळ्यातच निर्माण झाली आहे. सध्या जनावरांना खायला चारा शिल्लक नाही. या परिसरात बटाटा काढणी आणि ऊस तोडणी ही शेती कामे एका वेळेस सुरू झाल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. चारा टंचाईमुळे उसाच्या वाढ्यालादेखील हंगामाच्या सुरुवातीलाच 300 रुपये शेकड्याला मोजावे लागत आहेत. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये उसाच्या वाढ्याचे दरदेखील गगनाला भिडणार आहेत.

अतिपावसामुळे सध्या चारा टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. सध्या दुधाला बर्‍यापैकी दर मिळत असले तरी, दिवसेंदिवस पशुखाद्याचे दर वाढतच चालले आहे. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने मेळ घालणे कठीण झाले आहे. सध्या भूसा पोते 1500 रुपये, कांडी 1600 रुपये, सरकी पेंड 1900 रुपये, शेंगदाणे पेंड 2500 रुपये असे पोत्याचे दर आहेत. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या दुधाला लिटरला 40 रुपये दर मिळणे आवश्यक आहे; अन्यथा मेळ घालणे कठीणच आहे.

                      – बाळासाहेब टेमगिरे, अध्यक्ष, शिवशंकर दूध उत्पादक संस्था, थोरांदळे

Back to top button