

प्रसाद जगताप
पुणे : पीएमपीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक, सीएनजी आणि डिझेलवर धावणार्या बस आहेत. त्यांपैकी सीएनजीवरील बस परवडेल अशा दरात उपलब्ध होत आहेत. त्यासोबतच या बसमुळे इंधन खर्चात बचत होत आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासन आता पुढील काळात इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यापेक्षा सीएनजीवरील बस खरेदी करण्यावर भर देणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या 2 हजार 142 बस आहेत. त्यातील काही सीएनजी, काही इलेक्ट्रिक आणि काही डिझेलवर धावणार्या बस आहेत. त्यापैकी पीएमपी प्रशासनाने मागील वर्षात ताफ्यातील सर्व 12 मीटर लांबीच्या डिझेलवरील बसगाड्या भंगारात काढल्या आहेत. आता पीएमपीकडे डिझेलवरील मिडी बस शिल्लक आहेत.
डिझेलसाठी पीएमपीला मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता. त्यामुळे पीएमपीने ताफ्यातील डिझेल बस कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर देण्यासाठी पीएमपीने सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यातील सीएनजी बस परवडणार्या ठरल्या तर भाडेतत्त्वावरील ई-बस पीएमपीसाठी पांढरा हत्ती ठरल्या.
अशी आहे बसची किंमत
सीएनजी बस
44 लाख रुपये
ई-बस
दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक
ताफ्यातील विविध बस
सीएनजी – 1594
डिझेल – 150
भाडेतत्वावरील ईलेक्ट्रिक – 398 (आणखी 500 नव्या येणार)
भाडेतत्त्वावर बस जास्त
पीएमपी स्वमालकीच्या 1012
भाडे तत्वावरील बस 1130
एकूण गाड्या – 2142
भाडेतत्त्वावरील ई-बस तोट्याच्या…
पीएमपी प्रशासनाला भाडेतत्वावरील ई-बससाठी ठेकेदाराला किलोमीटरमागे 70 रूपये द्यावे लागतात. तर त्यांच्या बसचे प्रती किमी उत्पन्न 45 ते 46 रूपये इतकेच असते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला अतिरिक्त पैसे ठेकेदाराला द्यावे लागत आहेत. त्यासोबतच इतर खर्च पीएमपीलाच करावा लागत आहे. यामुळे पीएमपीला भाडेतत्वावरील बससेवा अजिबात परवडणारी नाही. त्यामुळे पीएमपी आता स्वमालकीच्या बस वाढविण्यावर भर देणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील भाडेतत्वावरील बस आणि स्वमालकीच्या बस यांची संख्या जवळपास सारखीच झाली आहेत. त्यातच भाडेतत्वावरील ई-बस न परवडणार्या आहेत. त्यामुळे आम्ही ताफ्यातील स्वमालकीच्या बस वाढविण्यासाठी बस खरेदी करणार आहोत. एका ई-बसच्या किंमतीत तीन सीएनजी बस येतात. त्यामुळे ई-बसपेक्षा ताफ्यातील स्वमालकीच्या बस वाढतील.
– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक