अबब…गायीची चक्क पावणेदोन लाखाला विक्री! सांगवीत 35 लिटर दूध देणारी गाय | पुढारी

अबब...गायीची चक्क पावणेदोन लाखाला विक्री! सांगवीत 35 लिटर दूध देणारी गाय

सांगवी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सांगवी गावाला दुग्धव्यवसायासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. परिसरातील वाघवस्ती येथील दत्तात्रय विजय वाघ यांच्या प्रतिदिन 35 लिटर दूध देणार्‍या गायीची विक्री चक्क पावणेदोन लाख रुपयाला झाली. परिसरात उच्चांकी विक्री होणारी ही पहिलीच गाय ठरली आहे.

सध्या लम्पी स्किनच्या शिरकावाने दूध उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शेतकर्‍यांच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर 36 रुपये दर मिळतो आहे. सध्या दुग्धव्यवसायाला चांगले दिवस आल्याने जनावरांच्या किमतीही वाढल्या आहेत. वाघवस्ती येथील दत्तात्रय वाघ यांच्या गोठ्यात एकूण 65 लहान-मोठी जनावरे आहेत.

त्यातील होस्टेन (एच. एफ.) जातीची एक गाय त्यांनी सोमवारी (दि. 7) विक्रीला काढली. त्या गायीला राजाळे (ता. फलटण) येथील सचिन निंबाळकर यांनी पावणेदोन लाख रुपयांना खरेदी केली. या गायीची विक्री करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद तावरे, डॉ. रंगराव एजगर, पोपट तावरे, महेश तावरे, दत्तात्रय तावरे, विलास वाघ, नानासाहेब वाघ, हनुमंत तावरे, महेश भापकर, महेश शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.

शेणखत आणि गोमूत्रातून देखील मिळतात पैसे
सांगवी परिसरातील बहुतांश शेतकर्‍यांनी दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून नावलौकिक मिळविला आहे. ज्या शेतकर्‍यांनी बारकाईने दुग्धव्यवसाय सुरू केला, त्यांनी जनावरांची निगा राखण्यासाठी अत्याधुनिक गोठे बांधले आहेत. जनावरांची स्वच्छता, टापटीप होत असल्याने दुधाबरोबरच शेण आणि गोमूत्र विक्री करून चार पैसे अधिकचे मिळण्यासाठी मदत होते.

Back to top button