पुणे पोलिसांची बिहारमध्ये धडक कारवाई, चोरीचे 22 लाखांचे 97 महागडे मोबाईल जप्त | पुढारी

पुणे पोलिसांची बिहारमध्ये धडक कारवाई, चोरीचे 22 लाखांचे 97 महागडे मोबाईल जप्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ऐन दिवाळीत नवीन मोबाईलचे दुकान फोडून विविध कंपन्यांचे 102 महागडे मोबाईल चोरी करत बिहारमध्ये जाऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य सूत्रधाराला हडपसर पोलिसांनी बिहार येथून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी 22 लाखांचे तब्बल 97 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 5 च्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार लक्ष्मण अण्णा जाधव (34, रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड पुणे), संकेत प्रकाश निवंगुणे (22, रा. बानगुडे चाळ, संघर्ष चौक, वारजे माळवाडी) आणि साहील अनिल मोरे (20, रा. देशमुखवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या आणखी चार साथीदारांचा पोलिस शोध घेत आहे. उरूळी देवाची येथे न्यू साई मोबाईल हे नवीनच दुकान उघडण्यात आले होते. आरोपींनी पाळत ठेवून दिवाळीच्या ऐन सणात 23 ऑक्टोबर रोजी हे मोबाईल दुकान फोडून विविध कंपन्यांचे तब्बल 102 महागडे मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी दुकानाचे मालक स्वप्निल सुभाष परमाळे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.

गुन्ह्याच्या अनुषंगाने हडपसर पोलिस ठाण्याचे तपास पथक लगेचच तपासाला लागले. दुकानातील तसेच दुकाना बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गुन्ह्यात एक अनोळखी आरोपी आणि त्याने वापरलेली गाडी पोलिस अमंलदार शाहीद शेख यांना निष्पन्न झाली. त्यावरून साहील अनिल मोरे (30, रा. देशमुखवाडी, इंगळे कॉर्नर, शिवणे, डुक्कर खिंड) याचा माग काढत त्याला गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले. नंतर पथकाने केलेल्या चौकशी साथीदार संकेत निवंगुणे, लक्ष्मण जाधव, संतोष मोरे, गजानन मोरे, पोपट धावडे यांची नावे निष्पन्न झाली. या दरम्यान संकेतला वारजे माळवाडीमधून ताब्यात घेण्यात आले. तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे व पोलिस नाईक संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लक्ष्मण जाधव हा बिहारमधील छपराच्या एकमा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अमंलदार शाहीद शेख, भगवान हंबर्डे हे तत्काळ बिहार येथे रवाना झाले. यावेळी चोरी केलेल्या मोबाईलची विल्हेवाट लावणार्‍या मोनुसिंग याच्या बिहार येथील घरी छापा टाकल्यानंतर तेथून लक्ष्मण जाधव याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

पोलिसांनी स्थानिक न्यायालयाकडून त्याची पोलिस कोठडी घेऊन त्याला प्रवासी कोठडीद्वारे पुण्यात आणले. त्याला लष्कर न्यायालयाने ही पोलिस कोठडी सुनावली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, गुन्हे निरीक्षक अरविंद शिंदे, विश्वास डगळे, अमंलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, सचिन जाधव, समिर पांडुळे, प्रशांत टोणपे अतुल पंधरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. मोबाईल विक्रेत्या दुकानदाराने पोलिसांनी घरफोडी उकल केल्यानंतर हडपसर पोलिसांचे आभार मानले.

बिहारमध्ये मध्यस्थालार मिळत होती 40 टक्के रक्कम

तपासात साहील मोरे, गजानन मोरे, प्रभात मोरे, पोपट धावडे या तिघांनी मिळून हडपसर, कोंढवा, धायरी, चतुःश्रृंगी येथील अनेक मोबाईल दुकाने फोडल्याचे निष्पन्न झाले. पुणे शहरात आपल्या साथीदारांच्या मदतीने जाधव रेकी करून मोबाईलची विक्री करणारी दुकाने हेरत असे. आरोपी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुकाने फोडत. नंतर चोरलेले मोबाईल जाधव हा बिहार येथील मोनुसिंग याला 40 टक्के एवढ्या किंमतीला विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुख्यसुत्रधार लक्ष्मण जाधव याच्यावर चोरी, खून हत्यार बाळगणे, लूटमार, अपहरणाचे, खंडणी, खुनाच्या प्रयत्नाचे तीन असे 9 गुन्हे कोथरूड ह्या एकाच पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर हवेली पोलिस ठाण्यात अहरण करून दरोडा, वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरी, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खंडणी, शिरूर पोलिस ठाण्यात खंडणीचा तर कोल्हापूर येथील शाहुवाडी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच हडपसर येथील दोन मोबाईल शहरातील एकूण पाच मोबाईल दुकाने फोडल्याचा जाधववर गुन्हा दाखल आहे. त्याला बिहारमधून पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे आणि कर्मचार्‍यांनी अटक करून पुण्यात आणले.
– अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे.

Back to top button