‘शेेफ’बरोबर चवही गेली ! कोरोनाकाळात गावाकडे गेलेले कर्मचारी पुन्हा आलेच नाहीत | पुढारी

‘शेेफ’बरोबर चवही गेली ! कोरोनाकाळात गावाकडे गेलेले कर्मचारी पुन्हा आलेच नाहीत

राहुल हातोले : पिंपरी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने लॉकडाउन घोषित केले होते. त्यानंतर आपल्या मूळ गावी गेलेले हॉटेलमधील शेेफ परतलेच नाहीत. यातील अनेकांनी गावीच स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या लॉकडाउन हटविण्यात आल्यामुळे शहरातील हॉटेलची झगमगाट वाढली असली तरी पदार्थांची चव गेल्याची भावना खवय्यांनी व्यक्त केली आहे.

हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार
पिंपरी-चिंचवड शहरात रोजीरोटीच्या शोधात राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून मजूर आले आहेत. यातील काही बांधकाम व्यवसाय, कंपन्यांमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. तर, काही हातगाडीपासून तर मोठंमोठ्या हॉटेल्समध्ये शेेफचे काम करत होते. राज्यातील विशेषतः कोकण विभागातील नागरिक बर्‍यापैकी हॉटेल व्यवसायामध्ये शेेफ म्हणून काम करत असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली. तर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व कर्नाटक आदी राज्यांतील नागरिकही या व्यवसायात तरबेज आहेत. यांच्या हातच्या चवीमुळे हॉटेल नावारूपाला आले होते.

कोरोना काळात आपल्या राज्यात गेलेले शेफ पुन्हा परतले नाहीत. त्यामुळे हॉटेलचे ग्राहक आता पूर्वीप्रमाणे राहिले नाहीत. चवीबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्याच्या शेेफला सांभाळता सांभाळता नाकी नऊ येत आहे. शेेफला उत्तम पगार, राहण्या व खाण्याची सोय करावी लागते. त्यांची मर्जी सांभाळून वेळेवर गरजा पूर्ण कराव्या लागतात.
                                                            – प्रशांत शिंदे, हॉटेल चालक, निगडी

नोकरी गेल्याने अनेकांनी गाठले होते घर
या शेफच्या जोरावरच टपर्‍यांच्या जागेवर मालकांनी हॉटेल्स सुरू केला होता. मात्र, कोरोना महामारी पसरल्यानंतर केंद्राने निर्बंध लादले. लॉकडाउनमुळे कंपन्या, हॉटेल्ससह सर्व उद्योग-व्यवसाय बंद पडले. यामुळे परप्रांतियांसह सर्वांनाच दैनंदिन गरजा भागविणे अवघड होऊन बसले होते. परिणामी रोजीरोटीच्या शोधात आलेले नागरिक मिळेल त्या वाहनांनी आपले घर गाठले.

Back to top button