निमगाव केतकीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार, बाह्यवळणाचा तिढा वाढला | पुढारी

निमगाव केतकीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार, बाह्यवळणाचा तिढा वाढला

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील निमगांव केतकी (ता. इंदापूर) येथील बाह्यवळणाच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेला तिढा आणखी वाढला आहे. मागील ९ महिन्यापूर्वी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मध्यस्थीने १०८ दिवस सुरू असलेले स्थानिक शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेतल्यानंतर आता पुन्हा बाह्यवळण रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल ३१ शेतकऱ्यांनी सोमवार (दि. ७) पासून बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यामध्ये वयोवृध्द महिलांचा देखील समावेश आहे.
या प्रकरणी लोकप्रतिनिधी चालढकल करीत असल्याचा आरोप आंदोलक सर्जेराव जाधव यांनी केला. सन २०१८ ला खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांची इंचभर ही जमीन जाऊ दिली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यानंतर सलग दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतर हा प्रश्न तुमच्या स्थानिक आमदाराकडे दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलन शेतकरी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे गेले: मात्र कोणाला दुखवायचं अशा भूमिकेत त्यांनी हात वर केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या ९६५ जी या रस्त्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या बाह्यवळण म्हणजेच रिअलाइनमेंटला स्थानिक शेतकऱ्यांचा मात्र विरोध आहे. या बाह्यवळणास विरोध दर्शवण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२१ पासून स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. जवळपास १०८ दिवस बेमुदत धरणे आंदोलन करुन मार्ग निघाला नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी दि. ३० जानेवारी २०२२ ला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
मात्र तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मध्यस्थीने यावेळी शेतकऱ्यांनी माघार घेत न्यायिक मार्गाने लढा देण्याचा निश्चय केला. मात्र शासन कोणत्याही स्थितीत निर्णय बदलत नसल्याने अखेर सोमवारपासून निमगांव केतकीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. निमगाव केतकी येथील जवळपास ३१ शेतकरी आता उपोषणाला बसले आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्यानुसार  प्राधिकरणाने चालू रस्ता १०० फूट असताना देखील ७० फूट दाखवून दिशाभूल केली आहे. चालू रस्त्याच्या दक्षिण बाजुने असणार्‍या जुन्या रस्त्यांचा विचार केलेला नाही. बाह्यावळण करू नये असा १५  ऑगस्ट २०१७ चा ग्रामसभेचा ठराव प्राधिकरणास सादर केलेला आहे. गुगल अर्थ नकाशानुसार रस्ता ३६०० मीटर लांबीचा दाखविला आहे आणि रिअलायमेंट रस्ता १५६० मीटर  लांबीचा दाखवून दिशाभूल केली आहे. चालू रस्त्याचे अंदाजपत्रक ६४ कोटी ४ लाख रुपये व रिअलायमेंट रस्त्याचे ३९ कोटी ८२ लाख दाखवून दिशाभूल केली आहे. मोजणीच्या नोटिसा काढून दडपशाही केली जात आहे.
यासाठी सक्षम प्राधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी ८ मार्च २०१८ रोजी बाधित होणारे  शेतकरी, अल्प भूधारक व मध्यम भूधारक आहेत. चालू रस्त्यावर अंडरपास करावा असा स्वयस्पष्ट अहवाल दिलेला आहे. प्राधिकरणाने अधिनियमातील तरतुदीचा भंग करून २७ मार्च २०१८ ची अधिसूचना कार्यवाहीविना रद्द करून २७  जानेवारी २०२१ ची अधिसू्चना जारी करून दडपशाही चालवलेली आहे. तसेच निकालपत्रामध्ये प्राधिकरणाने केलेला खुलासा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे.हे निकालपत्र आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही, अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. त्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही, असेही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी  सांगितले.
यावेळी सर्जेराव जाधव, संदीप भोंग, तात्यासाहेब वडापुरे, ॲड. सचिन राऊत, मच्छिंद्र आदलिंग, भारत बरळ, अक्षय चिखले, सचिन जगताप, बाबा म्हेत्रे, दत्तात्रेय भोंग, मच्छिंद्र आंदलिंग यांच्यासह जनाबाई वडापुरे,vसारिका बरळ या देखील आंदोलनात सामील झाल्या आहेत.

Back to top button