पुणे : उद्या चंद्रोदय ग्रहण लागलेल्या अवस्थेत, भारतात स्पर्शकाळ अनुभवता येणार नाही | पुढारी

पुणे : उद्या चंद्रोदय ग्रहण लागलेल्या अवस्थेत, भारतात स्पर्शकाळ अनुभवता येणार नाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी (दि. 8) भारतात सर्वत्र त्या-त्या गावच्या सूर्यास्तापासून चंद्रग्रहण दिसणार आहे. मात्र, भारतातून ग्रहणाचा स्पर्शकाळ दिसणार नाही. ग्रहण लागलेल्या स्थितीतच आपल्या देशात सर्वत्र चंद्रोदय होईल. यंदा दिवाळीत 25 ऑक्टोबर रोजी सर्वांना खंडग्रास सूर्यग्रहण पाहता आले. त्यापाठोपाठ 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर चंद्रग्रहण पाहण्याची संधी आहे.

याबाबत पंचांगकर्ते मोहन दाते यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कार्तिक शुध्द पौर्णिमा (दि. 8 ) चंद्रग्रहण आहे. ते भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश व संपूर्ण दक्षिण अमेरिका या देशांत दिसेल. या ग्रहणाचा स्पर्श भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल (ग्रहण लागलेला चंद्र) आपल्या गावच्या सूर्यास्तानंतर थोडावेळ हे ग्रहण खंडग्रास दिसेल.

तुलसी विवाहाबाबत…
मोहन दाते यांनी सांगितले की, पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह समाप्ती आहे. मात्र, त्याच दिवशी चंद्रग्रहण असल्याने सायंकाळी 6:19 नंतर म्हणजे ग्रहणमोक्ष झाल्यावर स्नान करून नंतर तुलसी विवाह करता येईल.

कार्तिकस्वामी दर्शन योग नाही
या वर्षी पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र, असा एकत्र योग होत नसल्याने कार्तिकस्वामी दर्शन योग मिळत नाही, अशी माहिती मोहन दाते यांनी सांगितली.

ग्रहणाचे वेध
हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 8 नोव्हेंबरच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी 6:19 पर्यंत) ग्रहणाचा वेध कालावधी
मानला आहे.

Back to top button