पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'मी देशाचा अर्थ राज्यमंत्री आहे; पण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत. रस्त्यावरून जाताना तुम्ही विकत असलेले पेरू पाहून मला मोह आवरता आला नाही…' 'साहेब तंत्रज्ञानाच्या युगात कशाला काळजी करता, खिशात पैसे नसले तरी तुम्ही आम्हाला ऑनलाइन पेमेंट करू शकता,' असे म्हणत गावातील महिलांनी क्यूआर कोड समोर करीत पेमेंट करण्याची विनंती केली.
डॉ. कराड यांनीदेखील महिलांचे कौतुक करीत त्यांच्यासोबत सेल्फी घेत त्यांच्या आनंदात भर घातली. पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन घेऊन शनिवारी सोलापूर मार्गे पुण्यात येताना डॉ. कराड यांना रस्त्यावर पेरू दिसले अन् त्यांनी गाडी थांबवत पेरूचा आस्वाद घेतला. हे करताना त्यांनी गावातील महिलांची फिरकी घेतली. गावातील महिलांनी मंत्र्यांची फिरकी तरबेज फलंदाजाप्रमाणे टोलवत त्यांनाही अचंबित केले.
'साहेब, मोदी है तो सब मुमकिन हैं…' असे म्हणत त्यांच्यासमोर क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी सांगत कोड समोर केला. तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचले आणि ग्रामीण महिलांनी ते अगदी सहजपणे वापरणे सुरू केल्याचे पाहून त्यांनी महिलांचे कौतुक केले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला.