पारगाव : ’भीमाशंकर’चा नावलौकिक आणखी वाढविणार : बाळासाहेब बेंडे | पुढारी

पारगाव : ’भीमाशंकर’चा नावलौकिक आणखी वाढविणार : बाळासाहेब बेंडे

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची देशपातळीवर वेगळी ओळख आहे. आम्हाला मिळालेल्या पदांचा शेतकर्‍यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उपयोग करून कारखान्याच्या नावलौकिकात आणखी भर टाकण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू. शेतकर्‍यांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

वळती (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळांचा सत्कार ग्रामस्थांनी केला, त्या वेळी अध्यक्ष बाळासाहेब बेंडे बोलत होते. या प्रसंगी उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक बाबासाहेब खालकर, बाळासाहेब घुले, शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, गणपतराव इंदोरे, किसनराव लोखंडे, उद्योजक मनोहरशेठ शेळके, जनाबाई आजाब, रमेश खिलारी, रामचंद्र ढोबळे, रामहरी पोंदे, पोपट थिटे, वैभव उंडे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले की, शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या दुरदृष्टीतून आंबेगाव तालुक्यात 22 वर्षांपूर्वी भीमाशंकर कारखान्याची उभारणी झाली. त्यानंतर शेतकरी खर्‍या अर्थाने सधन झाला. इतर पिकांच्या तुलनेत केवळ शाश्वत हमीभाव मिळवून देणारे एकमेव उसाचे पीक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची मानसिकता देखील ऊसपिकाकडे वळाली आहे. उसाचे क्षेत्र वाढल्याने आपण भीमाशंकर कारखान्याची गाळपक्षमता देखील वाढवली आहे. ऊसतोडणीच्या संदर्भात शेतकर्‍यांनी चिंता करू नये.

नियोजित वेळापत्रकानुसारच ऊसतोडी होतील. यामध्ये वशिलेबाजी चालणार नाही. शेतकर्‍यांना अडचणी आल्यास त्यांनी थेट कारखान्याशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणी, प्रश्न त्वरित सोडविले जातील, असे बेंडे म्हणाले. प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, यंदा अतिपावसाचा फटका सर्वच रस्त्यांना बसल्याने आता ऊसवाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. ग्रामस्थ, शेतकर्‍यांनी यासंदर्भात कारखान्याला त्वरित कळवावे. अडचणींची त्वरित सोडवणूक केली जाईल. कार्यक्रमात शिवाजीराव लोंढे, रामदास लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिवाजी लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाजे यांनी केले. महादेव भोर यांनी आभार मानले.

Back to top button