मंचर : इच्छुक उमेदवारांचा सोशल मीडियातून प्रचार; जि.प.,पं.स. निवडणुकीची तयारी जोरात | पुढारी

मंचर : इच्छुक उमेदवारांचा सोशल मीडियातून प्रचार; जि.प.,पं.स. निवडणुकीची तयारी जोरात

मंचर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कार्यकाल डिसेंबर महिन्यात संपत आहे. तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचाही कार्यकाल संपला असून, त्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या गेल्या असल्याने त्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आत्तापासूनच कामाला लागले आहेत.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वाढदिवस, दीपावली सण किंवा अनेक कारणांनिमित्त वाडी-वस्तीवर जाऊन पुढील एक ते दोन महिन्यांत होणार्‍या निवडणुकीसंदर्भात नागरिकांशी चर्चा करून पुढील काळात वस्तीवरील असणार्‍या सर्व समस्या सोडवू; परंतु होणार्‍या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ द्या, अशी आर्जव करीत आहेत.

कितीतरी उमेदवारांनी आत्तापासूनच सोशल मीडियावर भावी ग्रामपंचायत सदस्य, भावी सरपंच, भावी पंचायत समिती आणि जिल्हा सदस्य, अशा विविध पोस्ट टाकून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सोशल मीडियाच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्टेटस ठेवून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. प्रशासनानेसुद्धा कार्यकाल संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी इच्छुक उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातूनच होत आहे.

 

Back to top button