रस्तेप्रश्नी उद्योजकांच्या संघटना आक्रमक; चाकणमधील समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन | पुढारी

रस्तेप्रश्नी उद्योजकांच्या संघटना आक्रमक; चाकणमधील समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण औद्योगिक भागातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांची दैना झाली आहे. चाकण एमआयडीसीमधील कारखानदार आणि वाहतूकदार यामुळे त्रस्त झाले असून, याचा औद्योगिक स्थितीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तातडीने या भागातील महामार्गांची कामे मार्गी लावण्याच्या मागणीसाठी उद्योजकांच्या संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रस्त्यांशी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

देशातील वाहन उद्योगाचे अव्वल केंद्र बनण्याची क्षमता चाकणमध्ये असल्याची बाब येथे मर्सिडीज बेंज, ह्युंदाई, फोक्सवॅगन अशा अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मागील 15 ते 20 वर्षांत झालेल्या गुंतवणुकीने स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्राचे ‘डेट्रॉइट” म्हणून उभे राहू पाहणार्‍या चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

या भागातील खराब व अरुंद रस्त्यांनी वाहतूक कोंडीची आणि सततच्या अपघातांची शृंखला सुरूच आहे. पुणे-नाशिक महामार्ग, चाकण -तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गांची कामे त्वरित करावीत, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या वतीने निवेदन देण्यात आल्याचे संघटनेचे सचिव दिलीप बटवाल यांनी संगितले.

समस्यांची शृंखला
चाकण पंचक्रोशीचा व्याप आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागला आहे. वाढती वाहतूक कोंडी, घनकचरा, सांडपाणी, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, गुन्हेगारी आदी समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागल्या आहेत. या सर्व समस्या चाकण औद्योगिक परिसरात दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहेत. राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय ताकद एकवटली जात नसल्याने त्यांचे निराकरण, निर्मूलन करणे दुरापास्त झाल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. उद्योजकांच्या संघटना आता या बाबी शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत

 

Back to top button