पुणे : पिस्तूल बाळगणार्‍याला अटक | पुढारी

पुणे : पिस्तूल बाळगणार्‍याला अटक

पुणे / धायरी : बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍या व पोलिसांची चाहूल लागताच पळून जाणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांनी पाठलाग करून पकडले. केशव अशोक राठोड (24, रा. चरवडवस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून यावेळी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. त्याने हे पिस्तूल कशासाठी बाळगले, याचा पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांना व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार परिसरात पेट्रोलिंग करत असताना अंमलदार राणा रसाळ व देवा चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत एक जण संशयितरीत्या सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या रस्त्याने फिरत असल्याचे समजले. त्यांनी लागलीच याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांना दिली.

त्यांना एक संशयित व्यक्ती उभी असल्याचे दिसले. पोलिसांची नजरानजर होताच ती पळून जात असताना पथकाने पाठलाग करून पकडले. पोलिस उपनिरीक्षक तसेच तपास अधिकारी गणेश मोकाशी, अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, अमेय रसाळ, अमित बोडरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button