पुणे : ताब्यात घेतलेली बस पळविणार्‍याला अटक | पुढारी

पुणे : ताब्यात घेतलेली बस पळविणार्‍याला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आरटीओ प्रशासनाने कारवाई करून स्वारगेट येथील एसटी महामंडळाच्या पार्किंगमध्ये ठेवलेली खासगी ट्रॅव्हल्सची बस एकाने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली आहे. विजय चाटे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पुणे आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक विजय सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाटेचा ‘टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय आहे. वाहतूक नियमभंग करणार्‍या बसवर कारवाईसाठी आरटीओने मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत नोव्हेंबर 2021 मध्ये आरटीओ प्रशासनाने रोड टॅक्स न भरल्याप्रकरणी खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. यानंतर स्वारगेट येथे एसटी महामंडळाच्या पार्किंगमध्ये ही बस अडकवून ठेवण्यात आली होती. यादरम्यानच्या कालावधीत चाटे याने पार्किंमधून ही बस पळवून नेली.

काही महिन्यांनंतर वाहतूक नियमभंगप्रकरणी या बससाठी दंडाचे ‘चलन’ पडल्याचा मेसेज आला. त्यानंतर आरटीओच्या निदर्शनास हा प्रकार आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी चाटे याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button