सणसवाडीतील उद्योजकाच्या मुलाविरोधात बालविवाहाची तक्रार | पुढारी

सणसवाडीतील उद्योजकाच्या मुलाविरोधात बालविवाहाची तक्रार

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका उद्योजकाने त्याच्या अपंग मुलाचा विवाह एका अल्पवयीन मुलीशी केल्याची तक्रार एका तक्रारदाराने शिक्रापूर पोलिसांकडे केली आहे. सातत्याने पाठपुरावा करून देखील पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप देखील तक्रारदाराने केला आहे.

सणसवाडी येथील एक उद्योजक कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे भासवतो. या उद्योजकाच्या कुटुंबातीलच एका सदस्याने या उद्योजकाच्या अपंग मुलाचे लग्न अल्पवयीन मुलीशी झाल्याची तक्रार शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिली असून, त्याने पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत त्याने लग्नाचे फोटो, लग्नपत्रिका पोलिस ठाण्यात सादर केल्याचा दावा केला असून, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, याबाबत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले की, दोन्ही बाजूने मालमत्तेवरून वाद आहे. याबाबत तक्रारी आल्या आहेत. बालविवाहाबाबत तक्रार आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Back to top button