पुणे जिल्ह्यात 515 लाभार्थ्यांना मानधन; आणीबाणीतील बंदींना 12 कोटी 17 लाख रुपये वितरित होणार | पुढारी

पुणे जिल्ह्यात 515 लाभार्थ्यांना मानधन; आणीबाणीतील बंदींना 12 कोटी 17 लाख रुपये वितरित होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: देशामध्ये 1975 ते 1977 या कालावधीत घोषित आणीबाणी कालावधीत बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना गौरवार्थ मानधन देण्याबाबतची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2022 असे 27 महिन्यांच्या मानधनाची एकूण 12 कोटी 17 लाख 2 हजार 500 रुपये रक्कम पात्र 515 लाभार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

आणीबाणी कालावधीत एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा 10 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस, पतीस 5 हजार रुपये; तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस, पतीस दरमहा 2 हजार 500 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही योजना 31 जुलै 2020 च्या शासन निर्णयानुसार बंद करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने 28 जुलै 2022 रोजी शासन निर्णय जारी करून पुन्हा ही योजना सुरू केली असून, ऑगस्ट 2020 पासूनचे सर्व महिन्यांचे मानधन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या लाभार्थ्यांचे मानधन फरकासह जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले असून, तत्काळ तहसीलनिहाय वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

तहसीलनिहाय एकूण लाभार्थिसंख्या.
(कंसात नव्याने पात्र लाभार्थिसंख्या.)
पुणे शहर – 238 (9), हवेली – 161 (8), अपर तहसील पिंपरी चिंचवड – 61 (4), खेड – 4 (1), मुळशी – 8 (1), भोर – 13, मावळ – 19, दौंड – 3, बारामती – 3, पुरंदर – 2, जुन्नर – 3, शिरूर – 22 आणि इंदापूर -1 लाभार्थी.

 

Back to top button