पुणे : कोरोना पुन्हा आला तर रूग्णवाहिका कुठे आहेत ? | पुढारी

पुणे : कोरोना पुन्हा आला तर रूग्णवाहिका कुठे आहेत ?

प्रसाद जगताप

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 3 हजार 128 रुग्णवाहिका रुग्णांना सेवा पुरवत आहेत. या रुग्णवाहिका दोन्ही शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेने कमी आहेत. कोरोनाप्रमाणेच भविष्यात जर आपत्कालीन स्थिती उद्भवली, तर रुग्णवाहिकांचा भीषण तुटवडा भासू शकतो. त्यामुळे आत्ताच प्रशासनाने आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे.

मागील दोन वर्षे संपूर्ण जगावर कोरोनाच्या महामारीचे मोठे संकट उभे राहिले होते. त्या वेळीदेखील शहरात रुग्णवाहिकांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्याचा फायदा घेत, रुग्णवाहिका चालकांनी नागरिकांची अवाच्या सवा भाडे आकारून लूट केली होती. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यास प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. नागरिकांसाठी पूरक रुग्णवाहिका आणि आरोग्य यंत्रणा उभारणे देखील गरजेचे आहे. परंतु, सध्या आरटीओत करण्यात आलेल्या नोंदीनुसार रुग्णवाहिकांची संख्या लक्षात घेता, अपुरी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

रुग्णवाहिका रूपांतरासाठी हे नियम
वाहन रुग्णवाहिकेत रूपांतरित करायचे असेल, तर एआरएआय सारख्या संस्थेकडून आराखडा मंजूर करून त्यासंदर्भातील पत्र घ्यावे लागते. त्यानंतरच आरटीओकडून वाहनामध्ये बदल करण्यास परवानगी दिली जाते. अन्यथा ज्या वाहन कंपनीला रुग्णवाहिका परवानगी असेल, तेथूनच रुग्णवाहिका खरेदी करावी लागते.

अशी आहे स्थिती
पुणे शहर, जिल्हा
1 हजार 599
पिंपरी-चिंचवड
2029

रुग्णवाहिका चालकाने प्रमाणापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास नागरिकांनी याबाबत आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करावी. त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
-डॉ. अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

  • या नियमांचे व्हावे पालन…
  • नागरिकांकडून ज्यादा भाडे घेऊ नये
  • विनाकारण सायरन वाजवू नये
  • गाडीचा वेळेत मेंन्टेनन्स करावा
  • रुग्णवाहिकेत आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात
  • वेळोवेळी स्वच्छता करावी

Back to top button