बारामती : गोळीबार प्ररकणातील पाच जणांना पोलिसांकडून अटक | पुढारी

बारामती : गोळीबार प्ररकणातील पाच जणांना पोलिसांकडून अटक

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी तालुका पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. शुभम विकास राजपुरे (वय २४, रा. मुर्टी-मोढवे, ता. बारामती), तुषार चंद्रकांत भोसले (वय २२. रा. रुईपाटी, बारामती), सूरज राजू काशिद (वय २७, रा. सावळ, ता. बारामती), तेजस रतीलाल कर्चे (वय २१, रा. सुर्यनगरी, बारामती) व विक्रम लालासो बोबडे (वय २६, रा. रुई-सावळ, ता. बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गुरुवारी (दि. ३) सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील भिगवण रस्त्यावर ही घटना घडली होती. रिलायन्स पेट्रोल पंप येथे शुभम राजपुरे, तुषार भोसले यांनी सात ते आठ साथीदारांसह हातात कोयता घेऊन येत बारामतीचा मी बाप आहे, असे म्हणत ऋत्विक जीवन मुळीक, गणेश जाधव, अतुल भोलानकर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करू बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत जाधव याच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अक्षिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, तालुका पोलिस टाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नेताजी गंधारे, सचिन काळे, उपनिरीक्षक अभिजित सावंत, अमित सिद-पाटील, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, काशिनाथ राजापुरे, हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षीरसागर, असिफ शेख, अभिजित एकशिंगे, सचिन घाडगे, स्वप्निल अहिवळे, रामदास बाबर, राजू मोमीन आदींचे पथक नेमण्यात आले होते. याशिवाय तालुका पोलिस ठाण्याकडून सपोनि योगेश लंगुटे, दडस पाटील यांचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने तुषार भोसले, सूरज काशिद यांना पकडले. शुभम राजपुरे हा पिंपरी चिंचवड हद्दीत एका लाॅजवर थांबला होता. तेथून राजपुरे याच्यासह कर्चे व बोबडे यांना ताब्यात घेण्यात आले.

शुभम राजपुरेवर १३ गंभीर गुन्हे

या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम राजपुरे याच्यावर गंभीर १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात खूनाचा एक, खूनाच्या प्रयत्नाचा एक, दरोड्याचा एक, जबरी चोरीचे दोन, खंडणीचा एक, अवैध शस्त्र बाळगण्याचे दोन, मारामारीचे दोन व चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तो भोसरी येथील खूनाच्या गुन्ह्यात २०२० मध्ये जेलमध्ये होता. तो सध्या रजेवर सुटला आहे.

Back to top button