पुणे : खरिपातील शिलकी साठ्यामुळे मुबलक उपलब्धता | पुढारी

पुणे : खरिपातील शिलकी साठ्यामुळे मुबलक उपलब्धता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात गेल्या वर्षातील रब्बी हंगामात खतांचा प्रत्यक्ष वापर 26 लाख 93 हजार टन झाला असून, चालू वर्षी केंद्र सरकारने महाराष्ट्राला खतांचा 28 लाख 8 हजार टन पुरवठा मंजूर केला आहे. ही माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे यांनी दिली. शिवाय राज्यात खरीप हंगामातील खतांचा शिलकी साठा 14 लाख 61 हजार टन असल्याने खतांची मुबलकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतकर्‍यांकडून मागणी असलेल्या खतांमध्ये युरियाचा वापर प्रामुख्याने अधिक राहतो. महाराष्ट्रास मंजूर केलेल्या खतनिहाय पुरवठ्याच्या नियोजनात युरियाचा 9.79 लाख टन, डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) 2.50 लाख टन, म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) 1 लाख 29 हजार 600 टन, संयुक्त खते 9.50 लाख टन आणि सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) 5 लाख टनांचा खत पुरवठा मंजूर केला आहे.

राज्यात ऑक्टोबर महिना अखेर एकूण 3 लाख 98 हजार टन खतांचा पुरवठा क्षेत्रीय स्तरावर झाला आहे. उर्वरित खत पुरवठाही नियोजनानुसार होईल. त्यामुळे खतांची मुबलकता राहील, अशी अपेक्षा आहे. शिवाय राज्यात खरीप हंगामातील खतांचा शिलकी साठा 14 लाख 61 हजार टनाइतका आहे.

तसेच, युरियाचा सद्य:स्थितीत उपलब्ध खतसाठा 5 लाख 70 हजार टन असून, त्यामुळे राखीव साठा करण्यात येणार नाही. त्यामुळे एकूणच रब्बी हंगामात गरजेपेक्षा अधिक खतांची उपलब्धता असून, शेतकर्‍यांना काही अडचणी आल्यास नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

16 हजार 775 कोटी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट
रब्बी हंगामात शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते, औषधे आदी निविष्ठांची खरेदी वेळेत होण्याकामी बँकांनाही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले. त्यामध्ये एकूण 16 हजार 775 कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 5 हजार 262 कोटी आणि राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांना मिळून 11 हजार 513 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्तालयातून देण्यात आली.

Back to top button