बारामती बाजार समितीत ज्वारीला उच्चांकी भाव; 500 क्विंटल ज्वारीची आवक | पुढारी

बारामती बाजार समितीत ज्वारीला उच्चांकी भाव; 500 क्विंटल ज्वारीची आवक

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (दि. 3) ज्वारीची विक्रमी 500 क्विंटल आवक होऊन ज्वारीला प्रतिक्विंटल 4801 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. चांगल्या दर्जाच्या गव्हाला 3301 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बाजार आवारात मक्याची उच्चांकी आवक होऊन चांगल्या मक्याला प्रतिक्विंटल 2200 रुपये भाव मिळाला.

तसेच बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल या शेतमालाची आवक होऊन बाजरीला प्रतिक्विंटल 3561 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 1160 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल 5317, सूर्यफुलाची 760 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 7000 रुपये भाव मिळाला.

खरेदीदार म्हणून आवारातील अमोल वाडीकर, बाळासो फराटे, महावीर वडुजकर, नीलेश भिंगे, प्रताप सातव, दीपक मचाले, अशोक भळगट, सतीश गावडे, मिलिंद सालपे, शिवाजी फाळके, सिद्धार्थ गुगळे, संभाजी किर्वे, कल्पेश सोनवणे, यश संघवी यांनी सहभाग घेतला. बाजार आवारात शेतमालास चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांनी आपला शेतमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी चांगला भाव मिळेल, असा विश्वास बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप व प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी व्यक्त केला.

शेतमाल आल्यानंतर प्रथम वजन, नंतर लिलाव आणि लगेच रक्कम शेतकर्‍यांना मिळत असल्याने बारामती बाजारपेठेत शेतमाल विक्रीस गर्दी होत आहे. शेतकर्‍यांनी उत्पादित शेतमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून विक्रीस आणल्यास शेतकर्‍यांचा आर्थिक फायदा होईल, असे जगताप यांनी सांगितले.

Back to top button