निरेसाठी सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजना; राज्यातील पहिलाच प्रकल्प

निरा; पुढारी वृत्तसेवा: निरा (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील जनतेला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी हर घर जल, जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून 41 कोटी 58 लाख रुपये खर्चाची संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारी नवीन पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे ग्रामपंचायतीस शू्न्य वीजबिल येणार आहे. ही योजना राज्यातील ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच मंजूर झाल्याची माहिती निरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री विराज काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी जि. प. सदस्य विराज काकडे, चंदरराव धायगुडे, विजय शिंदे, योगेंद्र माने, सुजित वाडेकर, ग्रा. पं. सदस्य अनंता शिंदे, वैशाली काळे, राधा माने, शशिकला शिंदे आदी उपस्थित होते. तेजश्री काकडे म्हणाल्या की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. संजय जगताप यांच्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.
काही वर्षांपूर्वी निरा गावात फिल्टर योजना झाली. परंतु, निरेतील काही भागांत शुध्द पाणी मिळत नव्हते. काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण निरा गावाकरिता नवीन योजना प्रस्तावित केली.
उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की, निरा गावाकरिता सोलरवर चालणारी पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेत नदीला व कालव्याला पाणी नाही आले, तरी 45 दिवस संपूर्ण निरेला पाणी पुरेल एवढा 16 कोटी 10 लाख लिटरचा साठवण तलाव बांधण्यात येणार आहे. तसेच, 29 किलोमीटरची वितरणव्यवस्था, रस्ताखोदाई आदी कामाची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच, या योजनेकरिता पाइप शासन पुरविणार आहे. मीटरपद्धतीने नागरिकांना 24 तास पाणी देण्याचा प्रयत्न आहे.