‘नि-क्षय मित्र’ योजनेत महाराष्ट्र देशात दुसरा; राज्यात 21 हजार 187 क्षयरोग रुग्ण घेतले दत्तक | पुढारी

‘नि-क्षय मित्र’ योजनेत महाराष्ट्र देशात दुसरा; राज्यात 21 हजार 187 क्षयरोग रुग्ण घेतले दत्तक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारच्या ‘नि-क्षय मित्र’ योजनेअंतर्गत राज्यात 21 हजार 187 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे. देशात या योजनेला गुजरातनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरात सध्या क्षयरोगाचे 1 लाख 48 हजार सक्रिय रुग्ण आहेत. राज्याच्या क्षयरोग निर्मुलन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपर्यंत सुमारे 1 लाख 14 हजार रूग्णांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम योजनेंतर्गत समाविष्ट होण्यास संमती दिली आहे.

त्यापैकी 21,187 रुग्णांना मदत देण्यासाठी 2,386 प्रायोजक पुढे आले आहेत. रुग्ण दत्तक घेऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती निक्षय मित्र योजनेअंतर्गत अर्ज भरू शकते. कोणत्या प्रकारचे पोषण कोणत्या कालावधीसाठी द्यायचे आहे, याचा तपशील नमूद केला जातो. 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान विशेष शोध मोहीम आयोजित करण्यात आली होती.

क्षयरुग्णांना पोषक आहार मिळावा आणि त्यामध्ये समाजातील विविध घटकांना सामील होता यावे, यासाठी ‘निक्षय मित्र’ उपक्रम सुरू करण्यात आला. समाजातील विविध घटकांना क्षयरुग्णांसाठी मदतीचा हात देता यावा, यासाठी निक्षय मित्र योजनेअंतर्गत 9 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र शासनाने परवानगी दिली. तोवर योजनेअंतर्गत रुग्णांना पोषक आहारासाठी 500 रुपये दिले जात होते.

असे आहे निक्षय अन्न किट!
योजनेंतर्गत प्रत्येक रुग्णाला 700 रुपये किमतीचा आहार असलेली अन्नाची किट मिळते. यामध्ये 3 किलो धान्य, 250 मिली वनस्पती तेल, शेंगदाणे किंवा दूध पावडर (एक किलो) किंवा 6 लिटर दूध यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, भाज्या आणि फळे, व्हिटॅमिन बी आणि मिनरल्स सप्लिमेंट्स दिल्या जातात. याशिवाय कोणी इच्छुक असल्यास त्यांना मांसाहारही दिला जातो.

‘योजनेबाबत राज्यात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे आणि त्यासाठी करण्यात आलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे क्षयरोगाच्या रुग्णांना दत्तक घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेमध्ये अधिकाधिक नागरिक, कॉर्पोरेट कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याची गरज आहे.’
                                 -डॉ. रामजी आडकेकर, राज्याचे क्षयरोग अधिकारी

 

Back to top button