खडकीतील वाहतूक कोंडीमुळे लोक वैतागले; उपाययोजना करण्याची मागणी | पुढारी

खडकीतील वाहतूक कोंडीमुळे लोक वैतागले; उपाययोजना करण्याची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: खडकी रेल्वेस्थानकासमोरील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे तेथील वाहतूक व्यवस्था बदलली आहे. पिंपरीकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक दापोडीपासून (हॅरिस पूलापासून) खडकीच्या दिशेने वळविण्यात आली आहे. मात्र अनेक वाहने खडकीबाहेरील मार्गाने जाण्याऐवजी खडकीतील लहान रस्त्यांवरुन जात असल्याने अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत आहे. त्याला खडकीतील नागरिक आणि वाहन चालक वैतागले आहेत.

खडकी बाजारापर्यंत रोज सकाळी आणि सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होत असून, ही वाहतूक कोंडी लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे. जड वाहनांसह येथे चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. वेडीवाकडी वाहन चालविणारे दुचाकीस्वार, एकेरी मार्गातून उलट दिशेने येणारे चालक यामुळेही येथे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मेट्रोचे काम सुरु झाल्यामुळे पुण्यातून पिंपरीकडे जाणारी वाहतूक खडकी येथे एकेरी करण्यात आली. खडकी रेल्वेस्थानकासमोर हा रस्ता अरुंद असून, केवळ तीन ते चार लेनचा आहे.

यामुळे याठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असे. तेथे मेट्रोचे काम रस्त्याच्या कडेला सुरु झाल्यानंतर येथे वाहतूकीची कोंडी होऊ नये, यासाठी पिंपरीवरुन येणारी वाहतूक हॅरिस पूलापासून खडकी येथे वळविण्यात आली. सध्याला खडकीला पूर्ण वळसा घालून मूळा रस्त्याने ही वाहने पुण्याच्या दिशेने जात आहेत. मात्र, यामुळे खडकीमध्ये वाहतूक कोंडी होत आहे.

त्या कोंडीचा सामना खडकीकरांना करावा लागत आहे. या मार्गावर खडकी बाजारापर्यंत रोज कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही मोठी समस्या बनली आहे. अगदी रस्ता ओंलाडणेही पादचार्‍यांसाठी कठीण बनले असून, दिवसभर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. या कोंडीबाबत काहीतरी ठोस पावले उचलण्यात यावी, कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन द्यावा, असे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांचे म्हणणे आहे.

याविषयी आकाश गायकवाड म्हणाले, मी रोज नोकरीनिमित्त येथून जातो आणि सकाळी दहा वाजताही येथे वाहतूक कोंडी असते. येथे पाच ते दहा मिनिटे कोंडीतच जातात. ही परिस्थिती रोजचीच आहे. त्यावर काहीतरी तोडगा लवकरात लवकर काढला जावा. मेट्रोचे काम सुरु आहे हे समजू शकतो. पण, हे काम कधी पूर्ण होईल माहित नाही. तोपर्यंत आम्ही कोंडीचाच सामना करायचा का?कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्गही उपलब्ध करुन द्यावा.

 

Back to top button