शैक्षणिक धोरणासाठी आणखी एक पाऊल; पुणे विद्यापीठ आणि अमेरिकेतील ‘बीएमसीसी’ यांच्यात करारावर स्वाक्षर्‍या | पुढारी

शैक्षणिक धोरणासाठी आणखी एक पाऊल; पुणे विद्यापीठ आणि अमेरिकेतील ‘बीएमसीसी’ यांच्यात करारावर स्वाक्षर्‍या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, तसेच स्वायत्त महाविद्यालये यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी परदेशी विद्यापीठे व महाविद्यालयांशी जोडण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ‘बुरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज,’ (बीएमसीसी), सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांनी गुरुवारी विद्यापीठात ‘स्टेटमेंट ऑफ शेअर्ड इंटरेस्ट’वर स्वाक्षर्‍या केल्या.

त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने विद्यापीठाने आणखी एक पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि बीएमसीसी यांनीही ‘स्टेटमेंट ऑफ शेअर्ड इंटरेस्ट’वर स्वाक्षर्‍या केल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने हे करार करण्यात आले आहेत.

या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान जोगी, ‘बीएमसीसी’चे अध्यक्ष डॉ.अँटनी मुनरो, उपाध्यक्ष डॉ. संजय रामनाथ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक व अधिष्ठाता डॉ. विजय खरे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्यासह 30 स्वायत्त महाविद्यालयांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

भविष्यात नवे अभ्यासक्रम सुरू करणे, एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेणे, प्राध्यापक विद्यार्थी आदानप्रदान करणे आदी गोष्टी या ‘स्टेटमेंट ऑफ शेअर्ड इंटरेस्ट’मुळे करणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी विद्यापीठाने सुरू केली आहे. कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत व अमेरिकेचे शैक्षणिक सांस्कृतिक संबंध दृढ होण्यासाठीे कुलगुरू डॉ. कारभारी काळे व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे समन्वयक व डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी नुकतेच अमेरिकेतील अनेक शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.

Back to top button