लेण्याद्री : शिवनेरीवर सहा वर्षांच्या मुलावर माकडाचा हल्ला | पुढारी

लेण्याद्री : शिवनेरीवर सहा वर्षांच्या मुलावर माकडाचा हल्ला

लेण्याद्री; पुढारी वृत्तसेवा: किल्ले शिवनेरीवर (ता. जुन्नर) आलेल्या सहा वर्षांच्या मुलावर माकडाने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. 4) दुपारी घडली. या हल्ल्यात अध्यात्मक गायकवाड (वय 6, रा. मुंबई) हा जखमी झाला आहे. बनकरफाटा येथे राहणार्‍या मामाकडे दिवाळी सुटीला अध्यात्मक आईसोबत आला होता.

हे कुटुंब गडावरून फिरून खाली येत असताना महादरवाजाजवळ (पहिला दरवाजा) माकडाने अध्यात्मकवर अचाचा नक हल्ला करत डाव्या हाताचा लचका तोडला. यावेळी दुसरा एक पर्यटक कुत्र्याला घेऊन गडावर जात होता. त्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना हा प्रकार घडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

याप्रसंगी पुरातत्व विभागाच्या गोकुळ दाभाडे यांनी तातडीने या मुलाला ग्रामीण रुग्णालयात हलविले. ग्रामीण रुग्णालयात त्याच्या हातावर डॉ. योगेश आगम यांनी तातडीने सहा टाके टाकून प्रतिबंधक लस दिली. दरम्यान, विविध गडकिल्ल्यांवर जाताना खाद्य पॅकेट्स न आणणे, माकड-वानर यांना खाद्य पदार्थ दिसू नये तसेच त्यांना डिवचू नये, आदी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे. अध्यात्मकला उपचारासाठी मंचर येथे पाठविण्यात आले आहे.

Back to top button