पुणे : धमकाविणार्‍या सावकाराला बेड्या | पुढारी

पुणे : धमकाविणार्‍या सावकाराला बेड्या

पुणे : व्याजाच्या पैशासाठी रिक्षाचालकाच्या घरी माणसे पाठवून शिवीगाळ करीत जिवे ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका सावकाराला खंडणीविरोधी पथक-1 ने बेड्या ठोकल्या आहेत. बिलाल इसाक शेख (रा. डॉल्फिन चौक, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर त्याच्या तिघा साथीदारांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात खंडणी, महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 40 वर्षीय रिक्षाचालकाने फिर्याद दिली. मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी वेळोवेळी 29 हजार 500 रुपये 15 टक्के मासिक व्याजदराने घेतले होते. त्यानंतर फिर्यादीने 53 हजार 900 रुपये सावकाराला परत दिले.

मात्र, त्यानंतर देखील सावकार फिर्यादींना दंड व व्याजापोटी 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी करीत होता. त्याने त्याच्या तिघा साथीदारांना फिर्यादींच्या घरी पाठवून देऊन धमकाविले होते. तसेच, फिर्यादींकडून जबरदस्तीने चाळीस हजार रुपयांचा चेक लिहून घेऊन बाकीचे पैसे दिले नाहीत, तर बिलाल याचा भाऊ जेलमधून सुटून आल्यानंतर उचलून गायब करण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने खंडणीविरोधी पथक-1चे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्याकडे धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बिलाल शेखला अटक केली आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, यशवंत ओंबासे, कर्मचारी प्रमोद सोनवणे, रवींद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, किरण ठवरे यांच्या पथकाने केली.

Back to top button