नितीन राऊत
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबादेवाच्या जेजुरीनगरीत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांनी 19 एकरांत बांधलेला पेशवे तलाव तब्बल 40 वर्षांनंतर भरला असून, एक ऐतिहासिक व धार्मिक वास्तू असणारा हा तलाव गेली तीनशे वर्षे दुर्लक्षित झाला आहे. जेजुरीचा श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत. महाराष्ट्रात जी असंख्य शूरवीर घराणे तलवारीच्या जोरावर उदयाला आली, यापैकी बहुसंख्य घराण्यांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा होते.
12 व्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत जेजुरी गड, कडेपठार गड, ऐतिहासिक लवथळेश्वर मंदिर, पेशवे तलाव, होळकर तलाव, चिंचेची बाग, मल्हारतीर्थ, लक्ष्मीतीर्थ, जननीतीर्थ, गायमुख अशा अनेक भव्य वस्तू खंडोबादेवाच्या नगरीत भाविकांच्या सुविधांसाठी ऐतिहासिक काळात अनेक राजे व सरदारांनी निर्माण केल्या.
ऐतिहासिक काळात शाहू महाराज दरवर्षी पुण्याला येत, तर पेशवे सातार्याला जात. शाहूमहाराज पुण्याहून सातार्याला जाताना त्यांचा मुक्काम हुताशानीला जेजुरीत होत असे. पुणे-सातारा मार्गावर पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी दिवे घाटाखाली व जेजुरीत तलाव बांधण्याचे थोरले बाजीराव पेशवे यांना सांगितले. थोरले बाजीराव यांनी घाटाखाली मस्तानी, तर जेजुरीत बाजीराव तलाव बांधले. जेजुरीतील पेशवे तलाव हा 19 एकरांत गोलाकार बांधला आहे.
या बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगड 300 वर्षांनंतरही भक्कम पाहण्यास मिळतो. रमणा डोंगरातून येणारे पाणी या तलावात साठले जाते. या तलावाच्या पूर्व बाजूला अप्रतिम असे महादेवाचे बल्लाळेश्वर मंदिर आहे. या तलावातून शेतीला पाणी जाण्यासाठी ऐतिहासिक काळात उसासे निर्माण करण्यात आले आहेत.
जून ते ऑक्टोबर या कालावधीत जेजुरी परिसरात सुमारे 966 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने सुमारे चाळीस वर्षांनंतर हा पेशवे तलाव भरला आहे. या तलावातील पाणी शेतीसाठी आणि वीटभट्टीसाठी वापरले जाते. ऐतिहासिक काळानंतर आजपर्यंत या तलावासाठी कोणतीही विकासाची योजना राबविली गेली नाही.
एक ऐतिहासिक वास्तू आणि अप्रतिम बल्लाळेश्वर मंदिर असणार्या या तलावाचे सुशोभीकरण करून यात नौकानयन, मासेपालन होऊ शकते. एक पर्यटन क्षेत्र म्हणून हा परिसर विकसित झाल्यास जुनी जेजुरी परिसरात तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. अनेकवेळा या ठिकाणी विकास आराखडा राबविण्याच्या घोषणा झाल्या. शासकीय पातळीवर पाहणी झाली. मात्र, सर्व योजना कागदावरच राहिल्या आहेत.