पुणे : नव्या टर्मिनलचेे काम मार्चअखेर पूर्ण; प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार | पुढारी

पुणे : नव्या टर्मिनलचेे काम मार्चअखेर पूर्ण; प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे काम सध्या 80 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. या इमारतीचे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल तसेच इलेट्रॉनिक्सचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना नव्या टर्मिनलवरील सुविधेचा लाभ घेण्यासाठी चार ते पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नव्या टर्मिनल इमारतीमुळे पुणे विमानतळावरून आगामी काळात विमानोड्डाणांची संख्या वाढणार असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे विमानतळालाच लागून साकारत असलेली ही नवी टर्मिनल इमारत पुणेकरांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’च्या वतीने बुधवारी याची पाहणी करण्यात आली. या वेळी येथील विविध कामकाजाची माहिती घेण्यात आली. या टर्मिनल इमारतीचे सुमारे 80 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.

नव्या टर्मिनलच्या कामाला विलंब?
खासदार गिरीश बापट यांनी मागील वर्षी विमानतळ विस्तारीकरणाचा आढावा घेतला. त्या वेळी पत्रकारांना देखील येथे बोलाविण्यात आले होते. त्या वेळी पुणे विमानतळावर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले नवे इंटिग्रेटेड टर्मिनल सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. परंतु, आता या नव्या टर्मिनल इमारतीच्या कामाला 2023 उजाडणार आहे.

असे असेल नवे टर्मिनल
सध्याचे टर्मिनल – 22 हजार चौरस मीटर, दरवर्षीचे विमान प्रवासी – 80 लाख, नवे टर्मिनल – 5 लाख चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ, नवीन टर्मिनलची क्षमता – 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावणे शक्य

असे होतेय काम
नव्या टर्मिनलचे बांधकाम हे 2018 पासून सुरू, 80 टक्के काम पूर्ण झाले, अजूनही काम सुरू असून, पूर्ण होण्यास 2023 उजाड़णार

नव्या टर्मिनलवर या सुविधा…
प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज)
8 स्वयंचलित जिने (एस्कलेटर), 15 लिफ्ट , 34 चेक-इन काउंटर, प्रवासी सामान वहन यंत्रणा, आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेअर बेल्ट  खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, सुसज्ज आणि अत्याधुनिक प्रसाधनगृहे, अत्याधुनिक इंटिग्रेटेड टर्मिनल पूर्णत: वातानुकूलित, मनोरंजन, व्यावसायिक वापरासाठी 15 हजार चौरस फूट जागा.

पुणे विमानतळालगत असलेल्या नव्या टर्मिनल इमारतीचे काम आता 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. येत्या मार्च महिन्यांत येथील सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलची कामे पूर्ण होतील. त्यानंतर प्रवाशांना या इमारतीचा फायदा होईल.
                                                              – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Back to top button