पुणे : कामाशिवाय बॅरिकेड लावणार्‍या मेट्रोसह उड्डाणपुलाच्या ठेकेदारांना नोटीस | पुढारी

पुणे : कामाशिवाय बॅरिकेड लावणार्‍या मेट्रोसह उड्डाणपुलाच्या ठेकेदारांना नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील वाहतूक कोंडीला महापालिका जबाबदार की वाहतूक पोलिस, असा वाद सुरू असताना दोन्ही आयुक्तांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर या वाहतूक कोंडीचे खापर प्रकल्पाचे काम करणार्‍या ठेकेदारांवर फोडण्यात आले आहे. कामाशिवाय बॅरिकेड लावणार्‍या ठेकेदारांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

वाहतूक कोंडीवरून सर्व यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. शहरात विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. महामेट्रोकडून कर्वे रस्ता, नगर रस्ता या ठिकाणी काम सुरू आहे. पीएमआरडीए मेट्रोचे काम विद्यापीठ रस्ता आणि बाणेर रस्त्यावर सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी काम सुरू नाही अशा ठिकाणी बॅरिकेडिंग केले आहे.

त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पाहणीत समोर आले. त्यामुळे पीएमआरडीए मेट्रोचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीसह महामेट्रो, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम करणारी ठेकेदार कंपनी, कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम करणारी ठेकेदार कंपनी आदी कंपन्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कामे सुरू नाहीत तेथील बॅरिकेड काढण्याचे आदेश या नोटीसद्वारे देण्यात आले आहेत.

हे पर्याय केले जाणार 
विद्यापीठ चौकातून जवाहर चौकात यू टर्न घेऊन सेनापती बापट रस्त्याकडे जाण्याचा रस्ता तात्पुरता खुला करण्यात येणार आहे.
विद्यापीठ चौकाजवळील कामगारांसाठी असलेले कंटेनर काढले जाणार. सेनापती बापट रस्त्याने मॉर्डन शाळेच्या मैदानातून पाषाणकडे जाणार्‍या रस्त्याचे काम पुढील आठवडाभरात पूर्ण करण्यात येईल. काम बंद असतानाही बॅरिकेड आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, असे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले.

Back to top button