

गिरीश बक्षी :
चिखली : महावितरणच्या शाखा कार्यालयांमध्ये दहा वर्षांपूर्वी कार्यालयीन सहायक हे पद अस्तित्वात आल्यानंतर, वीज कंपनीने आजतागायत एकदाही त्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. ग्राहकांवर कधीच मेहेरबान होत नसलेली महावितरण त्यांच्या कार्यालयीन सहायकांवर मात्र चांगलीच मेहेरबान झाली आहे. वीज कंपनीच्या राज्यभरात असलेल्या शाखा कार्यालयांना कार्यालयीन सहायक हे पद दहा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले. त्याअंतर्गत हजारो कर्मचार्यांची भरती करून राज्यभरात त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यातील पुणे जिल्ह्यात सुमारे पाचशेहून अधिक कार्यालयीन सहायक कार्यरत आहेत.
शहरातील भोसरी आणि पिंपरी विभागाअंतर्गत वीस शाखा कार्यालये असून, त्या कार्यालयातही प्रत्येकी एक हे कर्मचारी त्या वेळी नियुक्त झाले. महावितरण कंपनीला कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बदल्या करताना शासनाचे निकष लागू आहेत. त्याचे पालन करून सगळ्या बदल्या केल्या जाणे गरजेचे आहे. असे असताना गेली दहा वर्षे कार्यालयीन सहायकांच्या बदल्याच करण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय अनेक कामात अडचणी येत बसल्याने या सर्व कर्मचार्यांच्या त्वरित बदल्या करण्याची मागणी ग्राहकांकडून होऊ लागली आहे. कोरोनाच्या काळात बदल्यांना स्थगिती होती. अजय मेहता हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी अतिशय परिपूर्ण असे बदल्यांचे निकष लागू केले होते. परंतु नंतरच्या काळात त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
बदल्या हा धोरणात्मक निर्णय असून याबाबत माहिती घेऊन काही सांगता येणे शक्य आहे. याबाबत उचित माहिती मुख्य कार्यालयच देऊ शकेल.
निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, पुणे महावितरण
असे असते कार्यालयीन सहायकाचे काम
विभिन्न शाखा कार्यालयांतर्गत असलेल्या सरासरी पन्नास हजार ते एक लाख वीजग्राहकांच्या समस्या जलद गतीने सोडविण्याच्या समन्वयाचे काम.
सामान्य नागरिकांसाठी शाखा कार्यालयात तक्रार, कुठलेही काम घेऊन गेल्यावर त्यांचे काम मार्गी लावणे,
अडचणी सोडविण्यासाठी शाखा अधिकार्याच्या
निर्देशानुसार काम करणे.