राजगुरुनगर बँकेच्या पॅनेलची धाकधूक वाढली; आ. दिलीप मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील नेत्यांची बैठक

राजगुरुनगर बँकेच्या पॅनेलची धाकधूक वाढली; आ. दिलीप मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील नेत्यांची बैठक
Published on
Updated on

सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : सध्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे बिगुल वाजण्याची शक्यता नसतानाही खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तातडीने गुरुवारी (दि. 3) बाजार समिती कार्यालयात तालुक्यातील पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगर पंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायती संदर्भातील पदाधिकारी यांची आमदार दिलीप मोहिते- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

रविवारी (दि. 6) राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीचा छुपा अजेंडा घेऊनच ही बैठक घेण्यात आल्याची चर्चा तालुक्यात आहे. परिणामी या बैठकीमुळे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील दोन्ही पॅनेलची धाकधूक वाढली आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचारामुळे सध्या तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यासाठी येत्या रविवारी (दि. 6) मतदान होणार असून, मतमोजणी सोमवारी (दि. 7) होणार आहे.

बँकेच्या निवडणुकीत थेट पक्षीय राजकारण होत नसले तरी राजकीय पाठिंब्याशिवाय निवडणूक पार पडणेदेखील कठीण असते. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार मोहिते-पाटील यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांची तातडीने बैठक घेतल्याने बँकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवरच ही बैठक घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे आमदार मोहिते-पाटील कोणत्या पॅनेलला अथवा दोन्ही पॅनेलमधील कोणत्या उमेदवारांना छुपा पाठिंबा देणार याबद्दल उत्सुकता आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी 29 हजार 921 मतदार असून, यापैकी एकट्या खेड तालुक्यातील मतदारांची संख्या 21 हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील मतदारच बँकेवर संचालक म्हणून कुणाला पाठवयाचे ते ठरवणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळेच आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची भूमिकादेखील महत्त्वाची ठरू शकते.

त्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत नक्की कोणता संदेश दिला गेला, यावरदेखील बँकेचे भविष्यातील राजकारण अवलंबून असणार असल्याची चर्चा आहे. दिलीप मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीसाठी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, कात्रज दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, महिला अध्यक्षा संध्या जाधव, युवती अध्यक्षा आशा तांबे, युवा अध्यक्ष जयसिंग दरेकर आदी उपस्थित होते.

तालुक्यात होणार्‍या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. बाजार समितीची निवडणूक हाच खरा बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा होता. सर्व पदाधिकारी एकत्र आल्याने रविवारी होणार्‍या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पक्षाच्या विचारांच्या उमेदवारांना मतदान करा, फक्त एवढेच सांगितले.

                                                   – दिलीप मोहिते-पाटील, आमदार, खेड तालुका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news