पुणे : वन्यप्राण्यांच्या शिकारीवरील बंदी उठवा; पर्यावरणाच्या हानीमुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे | पुढारी

पुणे : वन्यप्राण्यांच्या शिकारीवरील बंदी उठवा; पर्यावरणाच्या हानीमुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पर्यावरणाच्या हानीमुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळलेले आहेत. नागरिकांवरच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असल्याने वन्य जीवसंरक्षण कायद्यांतर्गत असलेली शिकारबंदी उठवावी, अशी अपेक्षा पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे. अ‍ॅड-व्हेंचर फाउंडेशनच्या वतीने ‘मारुती चितमपल्ली निसर्ग’ पुरस्कार डॉ. माधवराव गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर, गंगोत्री होम्स अ‍ॅण्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर, फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे, सुधीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. गाडगीळ म्हणाले की, पशुपक्ष्यांची घटती संख्या लक्षात घेऊन वन विभागाने पर्यावरण संरक्षण कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायदा केला. केवळ शिकार बंद करून प्राण्यांची आणि पक्ष्यांची घटती संख्या आटोक्यात येणार नाही. तर त्यासाठी नदी-नाल्यांमध्ये वाढते प्रदूषण रोखणेही गरजेचे आहे.

दिवसेंदिवस वन्यजीव प्राण्यांचे लोकवस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले असून, मानवावर हल्ल्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यासाठी शिकारबंदीचा कायदा उठवावा. परंतु, लोकशाही पध्दतीने आणि काही नियम घालून शिकारीची परवानगी द्यावी. पंचगंगा नदीसह इतर अनेक नद्या प्रदूषित झालेल्या आहेत.

कारखान्यांनी आणि खाणचालकांनी मात्र प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनाच हाताशी धरल्याने पर्यावरणाचा विध्वंस वाढत आहे. बेकायदेशीर खाणीमधून तब्बल 35 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला असून, प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांमार्फत मंत्र्यांना हिस्सा पोहचविला जातो. त्यामुळे माझा नदीप्रदूषणाचा अहवाल नाकारण्यात आल्याचा आरोपही डॉ. गाडगीळ यांनी केला.

केरकर म्हणाले, त्याचबरोबर लोकवस्तीमध्ये बिबट्याचे अतिक्रमण हे आपण केलेल्या पापाचेच भोग आहेत. माणसा-माणसांमध्ये स्पर्धा वाढली असून, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी शाश्वत जगणे गरजेचे आहे. मकरंद केळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन गौतमी देशपांडे यांनी केले.

Back to top button