पुणे : ताफ्यात स्वमालकीच्या बस वाढविण्यासाठी पुढाकार | पुढारी

पुणे : ताफ्यात स्वमालकीच्या बस वाढविण्यासाठी पुढाकार

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपी प्रशासन आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांचे अनुदान तसेच भाडेतत्त्वावरील बस याव्यतिरिक्त वेगळ्या मार्गाचा अवलंब करून म्हणजेच बँक कर्जाच्या माध्यमातून बस खरेदी करण्यावर भर देणार आहे. पीएमपीने ताफ्यातील स्वमालकीच्या बस वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या बसपैकी सध्या स्वमालकीच्या निम्म्या आणि भाडेतत्त्वावरील निम्म्या बस आहेत. त्यामुळे पीएमपीला यापुढील काळात ताफ्यातील स्वमालकीच्या बस वाढविणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन पीएमपीएचे नवनियुक्त अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी बँक कर्जाने बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असून, लवकरच पीएमपीच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसमध्ये वाढ होणार आहे.

1990 ते 1996 यादरम्यान पीएमपीचे तत्कालीन जनरल मॅनेजर ह. ल. सातपुते यांनी पीएमपीच्या बस कर्जाने घेण्याचा उपक्रम राबविला होता. त्यानंतर आता बकोरिया अशाप्रकारे बस खरेदी करणार आहेत.

पीएमपीच्या ताफ्यातील बस
स्वमालकीच्या
1012
भाडेतत्त्वावरील
1130
एकूण – 2 हजार 142

ताफ्यातील बसचे प्रकार
सीएनजी – 1594
डिझेल – 150
इलेक्ट्रिक – 398

अशी दिली जाते सेवा
रोजची प्रवासीसंख्या – 13 लाख
एकूण मार्ग – 369 मार्ग
एकूण बससंख्या – 2 हजार 142

रस्त्यावरील दररोजची एकूण बससंख्या
– 1650/1700 गाड्या

बसगाड्यांची एकूण रोजची धाव
– 3 लाख 60 हजार किमी

एका बसची प्रवासीक्षमता – 33 प्रवासी
एका बसची रोजची धाव – 230 किमी
एका बसची प्रवासी वाहण्याची क्षमता – 800

भाडेतत्त्वावरील बसचा फटका
पीएमपी प्रशासन दोन्ही महानगरपालिकांच्या अनुदानातून आणि भाडेतत्त्वावर बस खरेदी करीत आहे. परिणामी, आता भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढत आहे. पीएमपीच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बस कमी होत आहेत. मागे अचानकच ठेकेदारांनी संप पुकारला. तेव्हा पीएमपीच्या अनेक बस रस्त्यावरून दिसेनाशा झाल्या होत्या. त्या वेळी पुणेकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले अन् नाइलाजास्तव ठेकेदारांसमोर पीएमपी प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती.

भाडेतत्त्वावरील बसमुळे तोटाच
पीएमपी प्रशासनाला भाडेतत्त्वावरील बससाठी प्रतिकिलोमीटर 70 रुपये द्यावे लागतात, तर त्यांच्या बसचे प्रतिकिमी उत्पन्न 45 ते 46 रुपये इतकेच असते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला अतिरिक्त पैसे ठेकेदाराला द्यावे लागत आहेत. त्यासोबतच सीएनजीचा खर्च पीएमपी पीएमपीलाच करावा लागत आहे. यामुळे पीएमपीला भाडेतत्त्वावरील बससेवा अजिबात परवडणारी नाही. त्यामुळे पीएमपी आता स्वमालकीच्या बस वाढविण्यावर भर देणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बस आणि स्वमालकीच्या बस यांची संख्या सारखीच झाली आहे. त्यातच भाडेतत्त्वावरील बस न परवडणार्‍या आहेत. त्यामुळे आम्ही ताफ्यातील स्वमालकीच्या बस वाढविण्यासाठी बँक कर्जाने बस खरेदी करण्याचा विचार करीत आहोत.
                             – ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, 

Back to top button