पुणे : आता नाटकांची प्रसिद्धी सोशल मीडियातून | पुढारी

पुणे : आता नाटकांची प्रसिद्धी सोशल मीडियातून

सुवर्णा चव्हाण

पुणे : मराठी रंगभूमी दिन शनिवारी साजरा होत आहे. कोरोनामुळे मराठी नाटकांचे जग डिजिटल माध्यमांवर आले अन् मराठी नाट्यनिर्माते असो वा कलाकार यांनी हा नवा बदल स्वीकारला आहे. नवे असो वा जुने… प्रत्येक नाटकाच्या प्रयोगांची प्रसिद्धी नाट्य संस्थांकडून सोशल मीडियाद्वारे केली जात असून, आता तर नाटकांचे टीझरही यायला सुरुवात झाली आहे.

नाटकही आले ऑनलाइन माध्यमावर…
कोरोनामुळे मराठी रंगभूमीचा पडदा बंदच होता. त्यामुळे नाट्य कलाकारांनी सोशल मीडियाचा आधार घेत नाट्यअभिवाचनापासून ते नाटकांतील काही भागांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली अन् बघता बघता फेसबुक, इन्स्टाग्रामवर नाटकांच्या प्रयोगांचे सादरीकरणही सुरू झाले. कोरोनाच्या दोन वर्षांत मराठी रंगभूमीत नवा बदल झाला अन् सोशल मीडियावर आताही व्यावसायिक, प्रायोगिक, संगीत नाटकांच्या प्रयोगांची प्रसिद्धी करण्यासह नाटकांचे सादरीकरणही केले जात आहे. सोशल मीडियाने मराठी रंगभूमीला नवे वळण दिले असून, हा बदल कलाकारांनीही मनापासून स्वीकारला आहे.

अशी केली जाते प्रसिद्धी…
आतापर्यंत एखाद्या चित्रपटाची प्रसिद्धी सोशल मीडियावरून पोस्टर्स, टीझर्स अन् छायाचित्रांतून व्हायची. पण, आता काळाप्रमाणे बदलत नाट्यनिर्मात्यांनी सोशल मीडियावरून नाटकांची प्रसिद्धी करायला सुरुवात केली आहे. ऑनलाइन प्रसिद्धीचा फायदा नाट्यनिर्मात्यांना होत आहे. अधिकृत संकेतस्थळासह फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टि्वटरच्या माध्यमातून खास पोस्टर्स, छायाचित्रे, व्हिडीओ अन् टीझर्सद्वारे नाट्यप्रयोगांविषयीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवली जात आहे. यासाठी सोशल मीडिया टीम तयार केली असून, नाट्यप्रयोगांच्या तारखा, नवीन नाटकांची प्रसिद्धीही करण्यात येत आहे. नाट्यनिर्मातेही तंत्रस्नेही बनले आहेत, म्हणूनच ते नाटकांची प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे करण्याला प्राधान्य देत आहेत.

पारंपरिक प्रसिद्धीचे स्वरूप बदलले…
आतापर्यंत वृत्तपत्रांतील जाहिराती अन् प्रसिद्धिफलकाद्वारे नाटकांची प्रसिद्धी केली जायची. त्याद्वारेच प्रेक्षकांना नाट्यप्रयोगांविषयीची माहिती मिळायची. पण, आता नाट्यक्षेत्रातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक सोशल मीडियाकडे वळले. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नवे नाटक असो वा नाटकाविषयीची संपूर्ण माहिती आता सोशल मीडियाद्वारे दिली जात आहे.

टीझरचा प्रभावी उपयोग…
नाट्य कलावंतांच्या मुलाखती, नाटकातील काही दृश्यांचे खास व्हिडीओ, नाट्याभिवाचन, असे सारेकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले जात आहे. व्यावसायिक, प्रायोगिक आणि संगीत नाटकांची खास टीझर्समधून कुतूहलता निर्माण करण्यात येत असून, नाटकांचे कथानक, त्यात भूमिका करणारे कलाकार आणि नाटकांचे वैशिष्ट्य, असे सारेकाही प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न होत आहे. नाटकांचे टीझर्स आणि व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड करून नाटकांची प्रसिद्धी करण्यात येत आहे.

कोरोनामुळे नाट्यक्षेत्र काही दिवस ठप्प होते. प्रेक्षकही ओटीटी अन् इतर ऑनलाइन माध्यमाकडे वळले. म्हणून काळाप्रमाणे बदलत आता नाट्यनिर्मातेही तंत्रस्नेही झाले आहेत. ते सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत. नाट्यनिर्माते सोशल मीडियाचाही वापर करीत आहेत. या सगळ्या गोष्टीसाठी नाट्यनिर्मात्यांनी आणि नाट्यसंस्थांनी अधिकृत फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज तयार करून घेतले आहेत.

                                                                        – राहुल भंडारे, नाट्यनिर्माते

Back to top button