पुणे : बेकायदा सावकारी करणार्‍याला बेड्या; महिलेला धमकावून सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न | पुढारी

पुणे : बेकायदा सावकारी करणार्‍याला बेड्या; महिलेला धमकावून सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा: व्याजाने दिलेल्या पैशांवर मासिक पंधरा टक्के दराने व्याज घेऊन बेकायदा सावकारी करणार्‍या दाम्पत्यास खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जयराम निवृत्ती पोकळे (वय 43) आणि त्याची पत्नी हेमा ऊर्फ रेखा (वय 36, दोघे रा. धायरी) असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

याप्रकरणी गणेशनगर धायरी येथील एका 44 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना 3 जानेवारी 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली. फिर्यादी महिला या गृहिणी आहेत. एका मैत्रिणीच्या माध्यमातून त्यांची आरोपींसोबत ओळख झाली होती.

त्यांनी फर्निचर व्यवसाय व औषधोपचारासाठी आरोपींकडून 6 लाख 75 हजार रुपये 15 टक्के मासिक व्याज दराने घेतले होते. त्याबदल्यात व्याजापोटी वेळोवेळी मे 2022 पर्यंत 9 लाख 45 हजार रुपये दिले होते. फिर्यादीच्या मैत्रिणीने पोकळे दाम्पत्याकडून साडेपाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. फिर्यादीच्या मैत्रिणीनेदेखील त्यांना व्याजापोटी सात लाख 32 हजार रुपये परत केले.

त्यानंतर पोकळे यांनी समजुतीचा करारनामा करून त्यांच्याकडून मुद्दल आणि व्याजापोटी 18 लाख 83 हजार रुपयांची मागणी केली. पैसे परत न केल्यास सदनिकेचा ताबा घेण्यात येईल, असे समजुतीच्या करारनाम्यात लिहून घेतले. फिर्यादी, तसेच तिच्या मैत्रिणीला पोकळे यांनी धमकावले. व्याज, मुद्दल तसेच दंडापोटी पोकळे यांनी दोघींकडे 21 लाख 39 हजार रुपये मागितले.

सदनिकेचा ताबा घेण्यासाठी त्यांना धमकावले. अखेर महिलेने गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पोकळे दाम्पत्याला अटक केली. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विकास जाधव, कर्मचारी राजेंद्र लांडगे, रवींद्र फुलपगारे, हेमा ढेबे, नितीन कांबळे, अमर पवार, प्रवीण ढमाळ यांच्या पथकाने केली.

Back to top button