

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनी हल्ला करत दहशत पसरविल्यानंतर गावी पळून जाणार्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. प्रशांत भाऊसाहेब घाडगे (22, रा. गोरक्ष स्मृती बिल्डींग गुजरवाडी रोड, कात्रज, खोपडेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. 1 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले व त्यांचे अमंलदार यांना खुनाच्या प्रयत्नातील गावाला पळून गेलाला आरोपी पैसे नसल्याने पुण्यात येणार असल्याची माहीती त्यांना मिळाली होती.
तो मार्केटयार्ड येथील साहील हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून प्रशांत घाडगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्याला पुढील तपासासाठी आता बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अंमलदार अजय थोरात, इम्रान शेख, विठ्ठल साळुंखे यांनी ही कारवाई केली.